सोनी लिव्हवरील बहुप्रतीक्षित सीरिज 'फ्रीडम अॅट मिडनाइट' (Freedom at Midnight Series) १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि चाहते या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. डॉमिनिक लॅपियर व लॅरी कॉलिन्स यांच्या प्रख्यात पुस्तकावर आधारित सिरीज ‘फ्रीडम अॅट मिडनाइट' भारताच्या स्वातंत्र्यामधील महत्त्वपूर्ण क्षणांना प्रकाशझोतात आणते. या सीरिजमध्ये प्रतिभावान कलाकारांनी प्रख्यात स्वातंत्र्यसेनानींची भूमिका साकारली आहे. या कलाकारांपैकी एक आहे मलिष्का मेंडोन्सा (Malishka Mendonsa). जिने या सीरिजमध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील क्रांतिकारी लीडर सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारली आहे. नायडू यांचा लुक प्राप्त करण्यासाठी मलिष्काने मेकअप चेअरवर दररोज ४ तास व्यतित केले आणि परिपूर्ण प्रोस्थेटिक्स साध्य केले. या प्रक्रियेबाबत सांगताना ती म्हणाली की, प्रोस्थेटिक्स परिधान करण्याचे आव्हान होते. मी दररोज मेकअपसाठी खूप वेळ व्यतित केला, दिवसाला जवळपास ९ तास लागत होते, ज्यानंतर प्रोस्थेटिक्स योग्यरित्या बसवले जायचे. सरोजिनी नायडू यांच्यासारखे दिसण्यासोबत वावरण्याच्या आव्हानांचा देखील सामना करावा लागला. सूर्यप्रकाशात प्रोस्थेटिक्स वितळायचे, प्रोस्थेटिक्सखाली असलेल्या माझ्या चेहऱ्यावर घाम येत होता. यामुळे माझ्या चेहऱ्यावर घाम न येण्यासाठी आणि प्रोस्थेटिक्स वितळण्याला थांबवण्यासाठी मी सावलीमध्ये एसीच्या समोर बसत होते.''
मलिष्का म्हणाली...
ती पुढे म्हणाली की, “मेकअप आर्टिस्ट्सपासून आमचे दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्यापर्यंत सर्वांनी सर्वकाही परिपूर्ण असण्याच्या खात्रीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सेटवर त्यांची समर्पितता दिसत होती. प्रत्येक कलाकार व टीममधील सदस्याने सिरीज उत्तम होण्यासाठी अथक मेहनत घेतली. आव्हानांचा सामना केल्यानंतर देखील मिळालेले फळ उल्लेखनीय आहे. मी प्रेक्षकांना ही सिरीज पाहताना बघण्यास अत्यंत उत्सुक आहे. ही अत्यंत विशेष सिरीज आहे.''