संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) 'हीरामंडी' (Heeramandi) सिनेमाची सध्या चर्चा आहे. यामध्ये पाकिस्तानच्या 'हीरामंडी' या भागातील वेश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चड्डा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहलने काम केलं आहे. यात शर्मिन सेगलला (Sharmin Segal) मात्र तिच्या अभिनयावरुन सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलंय. विशेष म्हणजे ती संजय लीला भन्साळी यांची भाची आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत संजय भन्साळी म्हणाले, "ती मला सतत सांगत होती की मामा मी अंडरप्ले करेन. म्हणजेच कमी एक्सप्रेशन देईन. याउलट मी तिला विचारलं की मी कुठे तुला ओव्हरप्ले करायला सांगतोय का? मला तिच्या अभिनयातली ऊर्जा आवडली. मला माहितीये की नव्या पिढीचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यांच्या डोळ्यात दिसतं. ते नेहमीच मला विचारतात की मी खूश आहे का? अजून एक टेक घ्यायचाय का? पुन्हा एकदा हे करायचं का? तुम्ही ठीक आहात ना? आजकाल कोण इतकं विचारतं.
संजय भन्साळींनी भाचीला केलेल्या ट्रोलिंगवर थेट बोलणं टाळलं. सध्या सोशल मीडिया 'हीरामंडी'मय झालं असून शर्मिन सेगलने 'आलमजेब' ची भूमिका साकारली आहे. शर्मिनला भूमिका आणखी चांगली करता आली असती मात्र तिच्या चेहऱ्यावर शून्य हावभाव असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
'हीरामंडी' १ मे पासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. भव्य सेट, आकर्षक कॉस्च्युम ही भन्साळींची खासियत आहेच. या सीरिजमध्येही हे बघायला मिळतं.