संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali ) हे त्यांच्या लार्जर दॅन लाईफ चित्रपटांसाठी ओळखले जातात. बॉलिवूडप्रेमी भन्साळींच्या सिनेमांची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. आता मात्र सिनेमा नाही तर भन्साळी एक भव्यदिव्य सीरिज घेऊन येत आहेत. होय, 'हीरामंडी' (Heeramandi ) या सीरिजद्वारे भन्साळी ओटीटीच्या दुनियेत पदार्पण करत आहेत. काल 'हीरामंडी'चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आणि भन्साळींचे चाहते पुन्हा एकदा क्रेझी झालेत.
एका इव्हेंटमध्ये 'हीरामंडी'चा टीझरही लॉन्च करण्यात आला. यावेळी भन्साळी 'हीरामंडी'बद्दल भरभरून बोलले. १४ वर्षांपूर्वी मोइन बेग 'हीरामंडी'ची कल्पना घेऊन भन्साळींकडे आले होते. पण ही कल्पना प्रत्यक्षात साकारू शकली नाही. तब्बल १४ वर्षांनंतर ही कल्पना आता सत्यात उतरली आहे. याबद्दल भन्साळी बोलले.
काय म्हणाले भन्साळी?मी मोइन बेग यांचे आभार मानू इच्छितो. कारण १४ वर्षांपूर्वी ते 'हीरामंडी'ची कल्पना घेऊन माझ्याकडे आले होते. पण तेव्हा मी देवदास हा सिनेमा करत होतो. यानंतर मी बाजीराव मस्तानी केला. त्यामुळे या स्क्रिप्टकडे मी लक्ष देऊ शकलो नाही. एकदा मोइन माझ्याकडे आले आणि स्क्रिप्ट परत मागू लागले. पण आता त्यावर सीरिज बनतेय. मी ३० वर्षांत १० चित्रपट बनवलेत. गेल्या काही वर्षात मी ३ सिनेमे साकारलेत. आता ८ एपिसोड बनवतो आहे. 'हीरामंडी' सारखा वेब शो बनवणं एक आव्हान आहे. हे कठीण काम आहे. कारण यात खूप ट्रॅक आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सतत अलर्ट राहावं लागतं. सिनेमा बनवणं सोप्प आहे. पण सीरिज बनवणं कठीण काम आहे. सिनेमापेक्षा सीरिजला दुप्पट वेळ लागतो. सतत फोकस राहावं लागतं. मी 'हीरामंडी'मडे माझं बेस्ट दिलं आहे, असं भन्साळी म्हणाले.
संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ची कथा वेश्या आणि राण्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सीरिजचा टीझर पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. अद्याप याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. या वेब सीरिजमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल ६ बॉलिवूड अभिनेत्री झळकणार आहेत. मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख आणि शर्मीन सेगल या अभिनेत्रींचा रॉयल लुक या सीरिजमध्ये दिसणार आहे.