दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या 'स्कॅम' (Scam) सिरीजची सगळीकडेच चर्चा आहे. शेअर मार्केटमधील हर्षद मेहता घोटाळ्यानंतर आता त्यांनी तेलगी घोटाळ्यावर सिरीज आणली आहे. ही सिरीज देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते गगन देव रियार (Gagan Riar) यांनी आपल्या उत्तम अभिनयाची छाप सोडली आहे. तेलगीतील त्यांचा सहज सुंदर अभिनय पाहून कोणी दुसऱ्या अभिनेत्याची कल्पनाही करु शकणार नाही. गगन यांनी या भूमिकेसाठी कशी तयारी केली याचा अनुभव शेअर केला आहे.
एका मुलाखतीत अभिनेते गगन रियार म्हणाले, 'माझं आयुष्यच पालटलं आहे. माझ्याकडे शब्दच नाहीएत. ते म्हणतात अपेक्षेपेक्षा जेव्हा जास्त आनंद मिळतो तेव्हा कळत नाही की कसं रिअॅक्ट करावं. मला नव्हतं वाटलं की मला इतकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळेल. माझा आनंद गगनात मावेनासा झालाय.लोक मीम्स बनवून पाठवत आहेत. माझे डायलॉग सतत ऐकले जात आहेत. मी आता बोलत असताना तिकडे २५ ते ३० मेसेज आलेले आहेत ज्यांना रिप्लाय करायाचाय. इंडस्ट्रीतील माझ्या सहकलाकारांचेही सतत मेसेज आणि कॉल्स येत आहेत.'
रसगुल्ले खाऊन वजन वाढवलं
गगन म्हणाले, 'हंसल सरांनी मला कास्ट केलं तेव्हाच त्यांनी मला वजन वाढवावं लागेल असं सांगितलं होतं. मी माझ्या मर्जीने तीन महिन्यात ११ किलो वजन वाढवलं. नंतर मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा दिग्दर्शक तुषार सरही होते. तुषार सरांच्या चेहऱ्यावर मला पाहून काहीशी निराशा होती. ते माझं वजन बघून खूश नव्हते असं मला वाटलं. ते स्वत:च म्हणाले की नाही यार इतक्या वजनाने काम होणार नाही. तुला अजून वजन वाढवावं लागेल. मग मी आणखी सात आठ किलो वजन वाढवलं. जे एकूण १८ ते १९ किलो झालं होतं. वाढत्या वजनाला मेंटेन करणं माझ्यासाठी आव्हानच होतं. पण तुम्हाला याचा फायदा होतो.'
डाएट प्लॅनवर ते म्हणाले,'मला माझं डाएट पूर्णपणे बदलावं लागलं.न्युट्रीशनिस्ट प्रतीकने मला यात मदत केली. सकाळी काय खायचं, रात्री काय खायचं हे त्याने मला सांगितलं. त्याने चार्टच तयार केला होता. सकाळी मी पाच अंड्यांचं ऑम्लेट खायचो आणि बटर लावून चार टोस्ट खायचो. त्यानंतर ११ वाजता मिल्कशेक प्यायचो. यामध्ये ओटमील, बदाम, खजूर, आईस्क्रीम असायचं. जेवणात वाटीभर भाजी, चार ते पाच रोटी, नंतर संध्याकाळी परत मिल्कशेक. रात्री तेच रोटी भाजी आणि चार रसगुल्ले खाऊन झोपायचो. मला खाण्याची अजिबातच आवड नव्हती.माझ्यासाठी वजन वाढवणं खूपच स्ट्रेसफुल होतं. दोन वर्ष हे मेंटेन करणं खूप कठीण होतं.'
'स्कॅम 2003' सिरीज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. सध्या सिरीजचे ५ एपिसोड्स रिलीज झालेत तर बाकी एपिसोड्स नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहेत.