Join us  

'गंगूबाई काठियावाडी' फेम शंतनू माहेश्वरी दिसणार या वेबसीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 4:42 PM

Shantanu Maheshwari : अभिनेता शंतनू माहेश्वरी नुकताच 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये आलिया भटच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर आता तो इश्क इन द एअर या सीरिजमध्ये दिसणार आहे.

लोकप्रिय अभिनेता शंतनू माहेश्वरी (Shantanu Maheshwari) नुकताच 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये आलिया भटच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला. या चित्रपटासाठी अभिनेत्याचे खूप कौतुकही झाले. याशिवाय त्याने 'दिल दोस्ती डान्स', 'नच बलिए ९', 'ये है आशिकी', 'गर्ल्स ऑन टॉप', 'झलक दिखलाजा' आणि 'खतरों के खिलाडी'मध्येही काम केले आहे. शंतनूला प्रत्येक शोमध्ये चाहत्यांचे प्रेम मिळाले. आता तो इश्क इन द एअर या सीरिजमध्ये दिसणार आहे. बीबीसी स्टुडिओज प्रॉडक्शन इंडिया ने निर्मित केलेल्या या मालिकेत प्रतिभावान शांतनु माहेश्वरी  आणि मेधा राणा  यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याचा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये इंदूरमधील सर्जनशील आणि मेहनती फोटोग्राफर नमनचे आयुष्य उलगडते, जो त्याच्या कौटुंबिक व्यावसायाच्या यशस्वी साम्राज्यात गुंतलेला आहे. काव्या ही मुंबईतील एक मुक्त, उत्साही हेयरस्टाईलिस्ट आहे. जी स्वतःचा स्वतंत्र मार्ग घडविण्याच्या प्रयत्नात आहे. विमानतळावरील एका आकस्मिक भेटीत नमन आणि काव्या समोरासमोर येतात आणि त्यांच्या प्रणयरम्य प्रवासाला गती मिळते.  त्यांच्या जीवनात एक वळण येते. ते त्यांच्या नव्याने सापडलेल्या नात्याचा रोमांच शोधतात. नमन आणि काव्या एकमेकांच्या वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीतील अंतर कमी करून त्यांच्यात फुलत असलेल्या प्रेमाचा स्वीकार करू शकतील का? हे सीरिज पाहिल्यावर कळेल. 

शांतनु माहेश्वरी म्हणाला की, "अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर आणखी एक कथा घेऊन परत येताना खूप छान वाटते. ही मालिका प्रेक्षकांना खूप भावेल. इश्क इन द एअर  ही एक प्रेमकथा आहे. जी वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या नमन आणि काव्या या दोन व्यक्तींना एकत्र आणते. ते प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात करतात. नमन आणि काव्या, यांच्या प्रेमाचे विमान उंच भरारी घेत असताना, ते जीवनातील चढ-उतारांमधून संबंध आणि भक्तीचा खरा अर्थ शोधून काढतात. मी प्रत्येकाचा प्रतिसाद पाहण्यासाठी उत्सुक आहे. हे कथानक अतिशय प्रेमाने तयार करण्यात आले आहे. " 'इश्क इन द एअर' चा प्रीमियर २० सप्टेंबरपासून अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर होणार आहे.