Join us  

'हीरामंडी'च्या आलमजेबने ट्रोलिंगवर सोडलं मौन, नेमकं काय म्हणाली भन्साळींची भाची?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 1:39 PM

'झिरो एक्सप्रेशन्स' म्हणत शर्मिन सेगल सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. आता तिने स्वत:च यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी: द डायमंड बाजार' वेबसीरिजच्या दुसऱ्या सिझनची आज घोषणा झाली आहे. १ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या वेबसीरिजने सर्वांनाच प्रेमात पाडलं. भव्य सेट, हीरामंडी बाजार, अभिनेत्री, त्यांचे सुंदर कॉस्च्युम अशा प्रत्येक गोष्टीने लक्ष वेधून घेतलं. मनीषा कोईरालाने सीरिजमध्ये मल्लिकाजान ही भूमिका साकारली. तर आलमजेब या तिच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री शर्मिन सेगल (Sharmin Segal) दिसली. शर्मिन ही संजय भन्साळींची भाची आहे. सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यांच्या कामाचं कौतुक झालं पण शर्मिन मात्र चांगलीच ट्रोल झाली.

'हीरामंडी' सीरिज रिलीज झाली आणि सोशल मीडियावर शर्मिन सेगल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. सीरिजमध्ये शर्मिनचं काम कोणालाच आवडलं नाही. तिच्या चेहऱ्यावर कसलेच एक्सप्रेशन दिसत नाही म्हणत तिला ट्रोल करत अनेक meme बनले. या ट्रोलिंगला कंटाळून अखेर तिने इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शनच बंद केले. आता शर्मिनने स्वत:च या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "शेवटी प्रेक्षकच राजा असतात आणि एक कलाकार म्हणून याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. त्यांना त्यांचं मत देण्याचा अधिकार आहे. मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह. हीच एक गोष्ट आहे जी माझ्या योग्य दिशा दाखवते."

ती पुढे म्हणाली, "मला पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आल्याच नाहीत असं नाहीए. मात्र सर्वांनी निगेटिव्ह प्रतिक्रियांवरच जास्त लक्ष दिलं. मी आलमजेबच्या भूमिकेसाठी जीव ओतून काम केलं होतं. आपण निगेटिव्ह गोष्टी जास्त पाहतो पण पॉझिटिव्ह गोष्टीही असतात ज्याबद्दल आपण बोलत नाही. पण कदाचित पॉझिटिव्ह बोलण्यात त्यांना रस नाही आणि आपणही काही अंशी त्याकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा मला जाणवलं की मी या कारणामुळे मला ज्यांचं प्रेम मिळतंय तेही गमावत आहे. म्हणूनच मी आता मिळणाऱ्या प्रेमावर लक्ष देणार आहे."

टॅग्स :संजय लीला भन्साळीवेबसीरिजनेटफ्लिक्सट्रोलसेलिब्रिटीसोशल मीडिया