'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. या मालिकेत श्री हे पात्र साकारुन त्याने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. त्यानंतर अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांत तो विविधांगी भूमिका साकारताना दिसला. शशांक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्कॅम २००३' या हिंदी वेब सीरिजमध्येही झळकला. या सीरिजमध्ये त्याने जेके ही व्यक्तिरेखा साकारली आहे. शशांकच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
'स्कॅम २००३' या वेब सीरिजच्या निमित्ताने शशांकने नुकतीच महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने हिंदी वेब सीरिजमध्ये काम करण्याच्या अनुभवावर भाष्य केलं. याबरोबर मराठी कलाकारांकडे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक कोणत्या नजरेतून पाहतात, हेदेखील त्याने सांगितलं. शशांक म्हणाला, "मराठी कलाकार त्यांची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारू शकतात, हे हिंदी दिग्दर्शकांना माहिती आहे. एका टेकमध्येच मराठी कलाकार त्यांचं काम चोख करतात. त्यामुळेच अनेकदा कोणतंही माध्यम असलं तरी मराठी कलाकारांशिवाय त्यांना पर्याय नसतो."
शशांकबरोबरच 'स्कॅम २००३' या वेब सीरिजमध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली. या सीरिजमध्ये भरत जाधव, नंदू माधव, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी, विद्याधर जोशी हे मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सध्या शशांक 'मुरांबा' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.