बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन (Shekhar suman) सध्या संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) यांच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहेत. या सीरिजमध्ये ते जुल्फीकार ही भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे या सारिजमध्ये त्यांचा लेक अभिनेता अध्ययन सुमनदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे सध्या ही पिता-पुत्राची जोडी चर्चेत येत आहे. यामध्येच शेखर सुमन यांनी नव्या पिढीच्या कलाकारांवर निशाणा साधला आहे.
अलिकडेच शेखर सुमन यांनी 'बॉलिवूड नाऊ'ला मुलाखत दिली. या मुलाखतमध्ये त्यांनी नव्या पिढीचे कलाकार खऱ्या आयुष्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी किती धडपड करतात हे सांगितलं आहे. तसंच या कलाकारांमुळे लोकही त्रस्त झाल्याचं ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले शेखर सुमन?
"या काळात काही चांगल्या गोष्टीही आहेत मात्र, त्रुटीदेखील तितक्याच आहेत. सध्याच्या काळातील प्रत्येक कलाकाराला खऱ्या आयुष्यात प्रचंड प्रसिद्धी हवी आहे. त्यांना रातोरात स्टारडम हवाय. त्यांना प्रत्येक ठिकाणी चर्चेत रहायचं असतं, सतत त्यांच्याविषयी चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे मग ते सतत रील्स करत राहतात. सतत त्यांना पाहून वैताग आलाय आणि सतत या लोकांना पाहून लोकही वैतागले आहेत", असं शेखर सुमन म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "कलाकारांना त्यांच्या घरी, एअरपोर्ट, जीम सगळेकडे स्पॉट केलं जातंय. आणि, ते सुद्धा कायम सरप्राइज झाल्याची अॅक्टिंग करतात जसं काय त्यांना माहितच नसतं की लोक त्यांना स्पॉट करायला येणार आहेत ते. मुळात या लोकांना त्यांनी स्वत:चं बोलावलं असतं तरी सुद्धा ही अॅक्टिंग करतात."
दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्यांनी रेखाचेही आभार मानले. शशी कपूर, गिरीश कर्नाड आणि रेखा या तीन व्यक्तींमुळेच आज मी इथे आहे, असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.