Join us

मराठी वेब सीरिजचे पाऊल अडखळते कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 12:01 PM

Marathi web series: जे विषय चित्रपट-मालिकांमध्ये मांडता येत नाहीत ते दाखवण्याचे स्वातंत्र्य ओटीटीवर असूनही अद्याप बऱ्याच मराठी दिग्दर्शकांनी या माध्यमाची चवच चाखलेली नाही.

संजय घावरे

आज मराठी वेब सीरिजने अमराठी प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. आघाडीच्या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या काही मराठी वेबसीरिज खूप गाजल्या आहेत. इतकी लोकप्रियता लाभूनही मराठी वेब सीरिजची संख्या खूप कमी आहे, पण भविष्यात मराठी ओटीटीचा व्यवसाय १०० कोटी रुपयांच्या पार करणार असल्याचा अंदाज व्यवसायतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

मागील दोन-तीन वर्षांच्या काळात अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, सोनी लिव्ह, एमएक्स प्लेअर, झी५ या आघाडीच्या ओटीटीद्वारे मराठी वेब सीरिजने आपला ठसा उमटवला आहे. या जोडीला 'प्लॅनेट मराठी' या एकमेव मराठी ओटीटीनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 'समांतर १-२', 'शांतीत क्रांती', 'पेट पुराण', 'रानबाजार' या वेब सिरीजची जोरदार चर्चा रंगली आहे. लोकप्रियतेचा हा आलेख पाहता मराठी वेब सीरिजचा आकडा खूप कमी आहे. आजच्या काळातील माध्यम असलेल्या ओटीटीचा तरुणाईसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी स्वीकार केला आहे. असे असूनही मराठी निर्माते-दिग्दर्शक केवळ चित्रपट-मालिकांच्या मायाजाळात अडकले आहेत. जे विषय चित्रपट-मालिकांमध्ये मांडता येत नाहीत ते दाखवण्याचे स्वातंत्र्य ओटीटीवर असूनही अद्याप बऱ्याच मराठी दिग्दर्शकांनी या माध्यमाची चवच चाखलेली नाही. बरेच मराठमोळे दिग्दर्शक हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असून, काहींच्या हिंदी वेब सीरिज खूप गाजल्या आहेत. हे दिग्दर्शक अद्याप मराठी वेब सीरिजकडे वळलेले नाहीत. पॅन इंडियाद्वारे मराठी वेब सीरिज इतर भाषांमधील प्रेक्षकांपर्यंतही पोहोचते.

ओटीटी हे वैयक्तिक मनोरंजनाचे माध्यम असल्याने इथे कुठलाही विषय आडपडदा न ठेवता थेट मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आज भारतातील ८५ टक्के प्रेक्षक मोबाईलवर वेब सीरिजचा आस्वाद घेतात. मराठीत जर वर्षाकाठी अंदाजे १५० चित्रपट बनत असतील, तर महिन्याला सरासरी दोन-तीन वेब सिरीज बनायला हव्यात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सबस्क्रिप्शन, जाहिराती आणि कोणत्याही इतर ओटीटीसोबत विविध भाषांमध्ये डबिंग करून असे ओटीटीला मुख्यत्वे तीन प्रकारे इन्कम मिळते. आज वर्षाकाठी मराठी ओटीटीचा व्यवसाय २० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. पुढील वर्षभरात मराठी वेब ओटीटीचा व्यवसाय १०० कोटी रुपयांचा आकडा पार करेल असा व्यवसायतज्ज्ञांचा अंदाज आहे. आज एका मराठी वेब सीरिजचे बजेट ५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. हिंदीत हा आकडा ५०-१०० कोटी रुपयांच्याही पुढे गेला आहे. संजय लीला भन्साळींच्या 'हिरा मंडी'चे बजेट २०० कोटी रुपये आहे. 'हिरा मंडी'साठी भन्साळींनाच अंदाजे ६५ कोटी रुपये मिळणार आहेत. 

सचिन दरेकर (लेखक, दिग्दर्शक) -

'एक थी बेगम'चे दोन सीझन्स गाजल्यानंतर आता मराठी वेब सीरिजसाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी साहित्य वेब सीरिजद्वारे जगासमोर आणता येऊ शकते. आपल्या मातीतील साहित्य लोकांपर्यंत सहजरित्या पोहोचेल. एखाद्या दिग्दर्शकाने जर ठरवले, तर पुढील दहा वर्षे तो केवळ साहित्यावर वेब सीरिज बनवू शकतो. मराठी वेब सीरिजची संख्या जशी कमी आहे, तसे त्या सादर करणारे प्लॅटफॉर्म्सही कमी आहेत. भविष्यात संपूर्णपणे मराठी वेब सिरीज दाखवणारे प्लॅटफॉर्म्स येणार असल्याने मराठीला भरपूर वाव आहे. ओटीटीवर भाषेचे बंधन नाही. इथे रिअॅलिस्टीक कंटेंट चालतो. आज कोणतीही वेब सीरिज जरी पॅन इंडिया पाहिली जात असली तरी प्रादेशिक भाषेत बनवताना त्याचे बजेट खूप कमी होते. त्यामुळे कंटेंटला न्याय देणे थोडेसे कठीण बनत असल्याने मराठी वेब सीरिजची संख्या कमी आहे.

स्वप्नील जोशी (अभिनेता) -

मराठीमध्ये सातत्याने होत असलेले नवनवीन प्रयोग रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आम्ही वन ओटीटी घेऊन येत आहोत. 'वेब व्ह्युईंग' हा कॅान्सेप्ट मराठी रसिकांसाठी नवीन आहे. पेंडॅमिकमध्ये मोठा झालेला ओटीटी हळूहळू तळागाळापर्यंत पोहोचतोय. जस जशी ओटीटी पाहणाऱ्यांची संख्या वाढेल तस तसे त्याचे विषय बदलतील. येणारे दशक ओटीटीचे असेल. आम्ही जसे वेब शोजची संख्या वाढवण्यासाठी काम करतोय, तसे लोकांनी ते बघून सहकार्य केले पाहिजे. कारण ओटीटीचा व्यवसाय आकड्यांवर चालतो. जास्तीत जास्त प्रेक्षक जेव्हा मराठी वेब सीरिज बघतील, तेव्हा ओटीटीही जास्तीत जास्त मराठी वेब सीरिजची निर्मिती करेल.

सारंग साठ्ये (अभिनेता, दिग्दर्शक) -

"मराठीकडे कायम रिजनल लँग्वेज म्हणून पाहिलं जातं. तमिळ-तेलुगूसारखी वागणूक मराठीला मिळत नाही. 'शांतीत क्रांती' सहा भाषांमध्ये डब झाल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. प्रीमियम प्लॅटफॅार्मसाठी प्रीमियम कंटेंट बनवले पाहिजे. आपण आज लो बजेट आणि साधे शो बनवतोय. हे पाहण्यासाठी प्रेक्षक पैसे मोजणार नाहीत. प्रीमियम क्वालिटी कथानकापासून मेकींगपर्यंत प्रत्येक गोष्टीत दिसली पाहिजे. स्वत: पैसे घालून वेब सीरिज बनवायची की नाही या चक्रात आपण अडकलो आहोत. मराठी कंटेंट जेव्हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांना अपील होईल तेव्हाच मराठी वेब सीरिजची संख्या वाढेल. मराठी दिग्दर्शकांनी नेहमीचे ठोकताळे मोडून कंटेंट सादर करायला हवा." 

अक्षय बर्दापूरकर (संस्थापक-संचालक : प्लॅनेट मराठी)

"प्लॅनेट मराठीवर 'जॉबलेस', 'हिंग पुस्तक तलवार', 'रानबाजार', 'अनुराधा' या मराठी वेब सिरीज प्रदर्शित झाल्या असून, भविष्यात १८ प्रोजेक्टस येणार आहेत. यात 'मी पुन्हा येईन', 'राजीनामा', 'अथांग', 'एका हाताचं अंतर', 'गेमाडपंथी', 'कंपॉस' या मराठी वेब सीरिजचा समावेश आहे. मराठी ओटीटीला कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांसोबतच प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका वर्षामध्ये दोन लाख सबस्क्राईबर्स झाले आहेत. मराठीतील आघाडीचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते सध्या आगामी वेब सीरिजवर काम करत आहेत." 

टॅग्स :वेबसीरिजरानबाजार वेबसीरिजसेलिब्रिटी