Join us

“ते मला भिकारी समजले आणि...”, ‘ताली’ फेम मराठी अभिनेत्रीने शेअर केला शूटिंगदरम्यानचा ‘तो’ प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:52 PM

Taali : 'ताली'चं शूटिंग करताना कृतिका देवला आला 'असा' अनुभव, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेली ‘ताली’ ही वेब सीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली. तृतियपंथियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि त्यांना ओळख मिळवून देणाऱ्या तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री कृतिका देव हिने गौरी सावंत यांच्या बालपणीची म्हणजेच गणेश ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेतं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कृतिकाने ‘ताली’च्या शूटिंगदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.

कृतिकाने नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तालीच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक प्रसंग सांगितला. कृतिका म्हणाली, “गणेशला मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागावी लागली होती. तालीमधील हा सीन शूट करणं कठीण होतं. आम्ही मुंबईच्या रस्त्यांवर हिडन कॅमेऱ्याने हा सीन शूट केला आहे. रस्त्यावर मी एकटीच उभी होते. सिग्नलची लाल लाईट दिसली की मी भीक मागण्यासाठी रस्त्यावर यायचे. एका व्यक्तीने खरंच मला भिकारी समजून १० रुपये दिले होते.”

राखी सावंतला त्रास दिल्यामुळे सलमानने धमकावलं? तुरुंगातून बाहेर आलेल्या आदिलचा खुलासा म्हणाला, “मी त्याला...”

“हा प्रसंग आठवला की अजूनही माझ्या अंगावर शहारे येतात. त्या व्यक्तीला मी खरंच भीक मागत आहे, असं वाटलं होतं. माझ्या अभिनयासाठी ही एक प्रकारची दाद होती. मात्र, त्या भावना फार वेगळ्या होत्या. ती १० रुपयांची नोट आजही मी जपून ठेवली आहे. गौरी सावंत आणि त्यांच्यासारख्या अशा कितीतरी जणांना या परिस्थितीतून जावं लागलं असेल, याची जाणीव मला या प्रसंगानंतर झाली,” असंही पुढे कृतिकाने सांगितलं.

‘ताली’ वेब सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तर लेखक क्षितिज पटवर्धनने याचं लेखन केलं आहे. या सीरिजमध्ये ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, हेमांगी कवी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

टॅग्स :सुश्मिता सेनवेबसीरिजमराठी अभिनेता