सुपरहिट हॉलिवूड सिनेमा 'हॅरी पॉटर'(Harry Potter) मधील व्हिलन मॅलफॉय आठवतोय? अभिनेता टॉम फेल्टनने (Tom Felton) ही भूमिका साकारली होती. हाच टॉम फेल्टन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. हंसल मेहता (Hansal Mehta) लवकरच महात्मा गांधींच्या आयुष्यावर 'गांधी'ही वेबसीरिज घेऊन येत आहेत. यामध्ये टॉम फेल्टनचीही एन्ट्री झाली आहे. तो नेमका कोणत्या भूमिकेत दिसणार वाचा.
दिग्दर्शक हंसल मेहता 'गांधी' वेबसीरिजच्या शूटमध्ये व्यस्त आहेत. 'स्कॅम' फेम अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहे. डेडलाईन रिपोर्टनुसार, लंडनमध्ये महात्मा गांधी कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गेले असता तिथे त्यांना भेटलेल्या एका मित्राची भूमिका टॉम फेल्टन साकारणार आहे. गांधींचा या जवळच्या मित्राचं नाव जोशिया ओल्डफीड आहे. इतर स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधींच्या भूमिकेसाठी अभिनेत्री भामिनी ओझाची निवड करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये फेल्टनशिवाय अनेक परदेशी चेहरे दिसणार आहे. जेम्स मरे, जॉनो डेविस, मौली राइट, सायमन लेनन, राल्फ एडेनियि , लिब्बी माई आणि लिंडन अलेक्झांडरसह काही कलाकार असणार आहेत. सीरिजचा बराचसा भाग लंडनमध्ये शूट होत आहे. हंसल मेहता यांनी सोशल मिडिया पोस्ट करत या परदेशी कलाकरांची नावं जाहीर केली आहेत.
'गांधी' सीरिजमध्ये काम करण्यासाठी टॉम फेल्टन खूप उत्सुक आहे. डेडलाइनशी बातचीत करताना तो म्हणाला, "लंडनमध्ये गांधींच्या सुरुवातीच्या काळाचं शूट करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. हा इतिहासाचा महत्वाचा भाग आहे जे याआधी स्क्रीनवर दाखवण्यात आलेलं नाही आणि यात मी काम करतोय. हंसल आणि प्रतीकसोबत काम करायला मिळणं याचा मला आनंद आहे. "