Join us

'हे बाईपण एवढं सोप नाही'; तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंतने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 4:54 PM

Gauri sawant: तृतीयपंथींची दाढी करणं सोपं नाही; गौरी सावंतने सांगितलं कशा होतात वेदना

गौरी सावंत हे नाव सध्या घराघरामध्ये घेतलं जातंय. तृतीयपंथींच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ताली ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. अभिनेत्री सुश्मिता सेन हिने गौरी सावंत यांची भूमिका साकारली असून सध्या या सीरिजची सर्वत्र चर्चा होतीये. या सीरिजमुळे तृतीयपंथींच्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत, ते कशाप्रकारे जीवन जगतात हे समोर आलं. अलिकडेच गौरी सावंत यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी तृतीयपंथींच्या खासगी, सामाजिक आयुष्यावर थोडक्यात भाष्य केलं.

गौरी सावंत यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीची जडणघडण कशी होते. या समाजात आल्यानंतर त्याच्यात कसे बदल होतात हे सांगितलं. याविषयी बोलत असताना तृतीयपंथी लोक दाढी कसे करतात हे सुद्धा त्यांनी सांगितलं.

"साडी कशी नेसायची, कसं बसायचं या सगळ्या गोष्टी मला माझ्या गुरुंनी शिकवल्या. ठराविक काळानंतर आम्हाला दाढी यायला लागते. त्यामुळे दाढी करायला आमच्याकडे एक चिमटा असतो. त्या चिमट्याने आम्ही एक-एक केस ओढून काढतो. हे बाईपण एवढं सोप नाहीये", असं गौरी सावंत म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "पुरुषांचे हार्मोन्स शरीरात असल्याने दाढी येणं स्वाभाविक असतं. अशावेळी गुरु आईच्या मांडीवर डोकं ठेऊन त्यांनी मला दाढी कशी करायची हे शिकवलं.  २ रुपयांच्या ब्लेडने दाढी केलीस तर उद्या संध्याकाळपर्यंत पुन्हा दाढी येणार. त्यापेक्षा अशी मूळापासून दाढी करायची जेणेकरुन १५ दिवसांनी येईल. या सगळ्या गोष्टी आम्हाला गुरुंकडून शिकवल्या जातात." दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्यांनी गुरू त्यांच्या शिष्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी कशी मदत करतात हे सांगितलं. तसंच, तृतीयपंथींच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं. 

टॅग्स :वेबसीरिजसुश्मिता सेनट्रान्सजेंडरसेलिब्रिटी