Join us  

अक्षयच्या ‘वेलकम ३’मधून मजनू भाई आणि उदय शेट्टी गायब? टीझर पाहून नेटकरी नाराज, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 6:54 PM

Welcome 3 : 'वेलकम ३’च्या टीझरमध्ये मजनू भाई आणि उदय शेट्टी न दिसल्याने चाहते नाराज आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘वेलकम’ सिनेमाच्या तिसऱ्या भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयने त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘वेलकम ३’चा टीझर शेअर करत चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. तब्बल सात वर्षांनी वेलकमचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा रवीना टंडन आणि अक्षय कुमार ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पण, ‘वेलकम ३’च्या ट्रेलरमधून मजनू भाई आणि उदय शेट्टी गायब आहेत.

२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड करुन सोडलं होतं. या चित्रपटातील काही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली. मजनू भाई आणि उदय शेट्टी या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं होतं. ‘वेलकम बॅक’मध्येही ही पात्रे दिसली होती. परंतु, ‘वेलकम ३’च्या टीझरमध्ये मजनू भाई आणि उदय शेट्टी न दिसल्याने चाहते नाराज आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

एकाने ट्वीट करत “वेलकम ३ मजनू भाई आणि उदय शेट्टीच्या विना अपूर्ण आहे”, असं म्हटलं आहे.

तर दुसऱ्याने “जर उदय आणि मजनू नसतील तर चित्रपट फ्लॉप ठरेल”, असं म्हटलं आहे.

“वेलकम मजून आणि उदयशिवाय होऊ शकत नाही”

‘वेलकम’मध्ये अनिल कपूरने मजनू भाईची भूमिका साकारली होती. तर नाना पाटेकर उदय शेट्टीच्या भूमिकेत होते. ‘वेलकम ३’ मध्ये तब्बल २५ कलाकारांची फौज आहे. यातील एक कलाकार कोण? हे  अद्याप सांगण्यात आलेलं नाही. पण, टीझरमध्ये मजनू भाई आणि उदय शेट्टीची झलक न दिसल्याने मात्र चाहते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.

टॅग्स :अक्षय कुमारअनिल कपूरनाना पाटेकर