- अनुज अलंकारसत्ताधारी भाजपाचे काही नेते आमीर खानला लक्ष्य करण्याच्या खास मोहिमेवर काम करत आहेत ही बाब आता लख्ख होऊ लागली आहे. आधी आमीरच्या ‘पीके’ या चित्रपटाला विरोध, त्यानंतर असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्यावरून त्याच्यावर टीका व अतुल्य भारत अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर पद काढून घेणे आणि आता एकाच दिवशी भाजपाच्या दोन नेत्यांचे आमीरविरोधी वक्तव्य. एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने आमीरला टोमणा मारताना त्याने आपल्या पत्नीला भारत अतुल्य असल्याचे सांगावे असे म्हटले, तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील एका नेत्याने ‘दंगल मे मंगल’ करेंगे असे म्हणत आमीर खानचा चित्रपट दंगलला विरोध करण्याची धमकी दिली आहे. गोष्ट स्पष्ट आहे. जेव्हा कधी दंगल चित्रपट येईल तेव्हा हे नेते व त्यांचे समर्थक त्याच्यावर बहिष्काराची मोहीम हाती घेतील. यापूर्वी शाहरूख खानच्या वक्तव्यावर नाराज होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी त्याच्या दिलवाले चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहीम राबवली होती. भाजपाची सत्ता असलेल्या चार राज्यांत दिलवालेला जोरदार विरोध करण्यात आला. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, देशाचे सरकार चालविणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना आमीर खानकडून काय हवे आहे. आमीरने असहिष्णुतेबाबतच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करून माफीही मागितली आहे. त्यामुळे विषय आतापर्यंत संपायला हवा होता; परंतु सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना हे होऊ द्यायचे नाही. या नेत्यांना कुठे ना कुठे सरकारी पातळीवरून पाठिंबा मिळत आहे, त्यामुळेच ते अशा मूर्खपणाची व्यक्तव्ये करत आहेत, असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. आमीरच्या वक्तव्याबाबत नाराजी असू शकते आणि अशी नाराजी असणे गैरही नाही. तथापि, या वक्तव्यावरून करण्यात आलेला गदारोळ, त्यानंतर अतुल्य भारतचे ब्रँड अॅम्बेसेडर पद काढून घेणे आणि आता ‘दंगल’वरून धमक्या. यावरून हेच वाटते की, आमीरला लक्ष्य करण्यासाठी हे जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. भाजपाने पुढे येऊन आमीरविरोधी मोहीम चालविणाऱ्या नेत्यांना लगाम लावावा लागेल आणि तसे झाले नाही, तर आमीरने जे म्हटले होते तेच खरे ठरेल. सरकार आणि भाजपा आमीरविरोधी मोहीम थांबविण्यासाठी आपल्या पातळीवर मोहीम राबवेल, अशी आशा आणि प्रार्थना आहे.
आमीर खानकडून हवे तरी काय?
By admin | Published: January 17, 2016 3:18 AM