Join us

असं वळण आयुष्यात आलंच नसतं तर? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 11:29 AM

प्रत्येकाच्या वाटचालीतला हा  ‘टर्निंग पॉईंट’! आज मागे वळून बघताना नेहमी वाटत राहतं... असं वळण आयुष्यात आलंच नसतं तर?

- चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक)

आतापर्यंत औरंगाबादमध्ये ‘धडपडणारी मुलं’ ही अवस्था आम्ही ओलांडली होती. इतर नाट्य संस्थांमधले बुजुर्गही आता जिगीषात येऊन वेगवेगळ्या नाटकांमध्ये भूमिका करायला आनंदानं तयार होत होते. ‘परिवर्तन’सारखी संस्था तर थोरल्या भावासारखी आमच्या पाठीशी होती, शहरातही इतर संस्थांमधल्या भिंती पडत चालल्या होत्या, एक खुलं सकारात्मक वातावरण तयार होत होतं, आमच्या प्रत्येक नाटकाबद्दल वर्तमानपत्रांत छापून येत होतं; जिगीषातले सगळेच एका मैत्रीच्या, सहवासाच्या घट्ट नात्यानं कुटुंबासारखे जोडले गेले होते... एक आवर्तन पूर्ण झालं होतं !

अशी सुरळीत दैनंदिनी सुरू असताना अचानक एके दिवशी प्रशांत म्हणाला, “नाट्यक्षेत्रात पूर्णवेळ काम करायचं ठरवून आपण सगळ्यांनी मुंबईला स्थलांतर केलं तर? आपण गेली काही वर्षे इथे अत्यंत मन लावून, जीव झोकून पद्धतशीरपणानं हेच काम केलंय... पण याच वळणावर जर आपण स्थिरावलो, इथेच थांबलो; तर मग मात्र पुढच्या सगळ्या शक्यता आजमावण्याचा विचार नंतर कधीच होणार नाही.” हे सगळं मी ऐकत होतो... काय बोलावं, ते सुचत नव्हतं. “विचार अगदी बरोबर आहे, पण मला घरच्या परिस्थितीमुळे जमेल असं वाटत नाही...” हीच माझी त्या वेळची तत्काळ प्रतिक्रिया होती. हे सगळं मी १९८७ ते १९९० या काळातलं बोलतोय ! तेव्हा खासगी वाहिन्या आल्याच नव्हत्या.

कलाक्षेत्रात पूर्णवेळ करिअर करण्यासाठीचे आजच्यासारखे मुबलक पर्याय उपलब्ध नव्हते. सिनेमा हा तर तेव्हा दूरचाच पर्याय वाटत होता. फक्त ‘नाटक’च समोर दिसत होतं. मुख्य म्हणजे हे करताना आमच्यापैकी कुणाचीही औरंगाबादमध्ये भक्कम स्थावर जंगम मालमत्ता नव्हती. सगळेच मध्यम वर्गातले. प्रत्येकाकडे उत्तम शैक्षणिक गुणवत्ता मात्र होती. मुंबईत कुणाची ठोस ओळखही नव्हती, ना कुणाच्या शिफारशीची चिठ्ठी; लगेच काम मिळेल, याचीही खात्री नव्हती. एकत्रच जाऊ, प्रयत्न करू; नाही जमलं तर बॅग उचलून परत येऊ... पण नंतर ‘आयुष्यात असं केलं असतं तर..?’ अशी खंत, हळहळ पुढे वाटायला नको; म्हणून हे सगळं चाललं होतं. सगळ्यांनी मिळून जाऊ, असं वाटण्यामागे मैत्रीची भावना होतीच; पण पुढे संघर्षाच्या प्रवासात, सुखदुःखात, यशापयशात एकमेकांना मानसिक आधार असावा असंही वाटत होतं.

आशानिराशेच्या वेळी एकमेकांशी झालेला संवादच तुम्हाला उभारी देऊ शकतो, हे नक्की माहीत होतं. म्हणूनच त्यावेळी ‘जिगीषा’नं केलेलं हे सामूहिक स्थलांतर पुढे सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेकांसाठी दिलासा देणारं, प्रेरणा देणारं ठरलं. अशा अवघड निर्णयाच्या प्रसंगी सगळ्यात समजूतदार, अनपेक्षित भूमिका घेतली, ती आम्हा सर्वांच्या पालकांनी. ते या निर्णयाला परवानगी देऊ पाहत होते.  त्याच वेळी माझ्या घरात, वैयक्तिक आयुष्यात वेगळ्याच घटना घडत होत्या. माझ्या आईला दुर्धर कॅन्सरनं गाठलं होतं. बहिणीचं लग्न आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडणं, हे जास्त गरजेचं होतं. पण माझी आई शांत, ठाम सुरात म्हणाली, “जर सगळे जाणार असाल, तर नक्की जा. मागचा-पुढचा विचार प्रशांतनं नक्कीच केला असणार.

फक्त परिस्थितीमुळे आपण मनासारखं करू शकलो नाही, हे तुला पुढे आयुष्यभर कायम वाटत राहील. तू निश्चित जा. आत्तापर्यंत जसं आपण निभावतोय, तसंच पुढेही निभावू. पण आता तुम्ही मागे फिरू नका.” माझ्या आयुष्यात दोन अत्यंत महत्त्वाची ‘स्थलांतरं’ झाली. वयाच्या तिसऱ्या वर्षी हमदापूर ते औरंगाबाद आणि पंचविसाव्या वर्षी औरंगाबाद ते मुंबई. आणि हे दोन्ही निर्णय घेणारा मी नव्हतोच. दूरदृष्टीची ती दोन माणसं होती, आई आणि प्रशांत. फक्त माझ्या एकट्याच्याच नाही, तर संपूर्ण जिगीषाच्या पुढच्या प्रवासाला या स्थलांतराची भक्कम पार्श्वभूमी आहे. प्रत्येकाच्या वाटचालीतला हा  ‘टर्निंग पॉईंट’! आज मागे वळून बघताना नेहमी वाटत राहतं... असं वळण आयुष्यात आलंच नसतं तर?

(राजहंस प्रकाशनाच्या ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’, या पुस्तकातील संपादित अंश)

टॅग्स :मराठी नाट्य संमेलन