मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सहनिर्मिती केली आहे. थ्री आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. "मिस यू मिस्टर" या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.
मृण्मयीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की, तुझी मध्यरात्र असो किंवा माझ्याकडची पहाट, आपलं बोलणं होणं महत्त्वाचं!
चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली की 'मिस यू मिस्टर'चे लेखक आणि दिग्दर्शक समीर जोशी यांच्याबरोबरचा हा माझा दूसरा चित्रपट असून या आधी मी त्याच्या 'मामाच्या गावाला जाऊया' या सिनेमामध्ये काम केले होते. 'मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते’.