१२ वर्षाच्या असताना दिलीप कुमार यांच्यावर प्रेम करायला लागल्या होत्या सायरा बानो, जाणून घ्या रंजक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 08:44 AM2021-07-07T08:44:52+5:302021-07-07T08:54:24+5:30
खरे तर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच सायरा दिलीप कुमारांवर फिदा झाल्या होत्या. वयाच्या 22 व्या वर्षी सायरा बानोचे 44 वर्षांचे दिलीप कुमार यांच्याशी लग्न झाले.
हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानचे आज पहाटे त्यांना अखेरचा श्वास घेतला.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी संपूर्ण चित्रपटसृष्टीतच नव्हे तर देशभरात लोकप्रिय आहे. दोघांचीही केमिस्ट्री पाहून चाहते आजही खुश होतात. विशेष म्हणजे अभिनयापेक्षा सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमकथेने लोकांची मने जिंकली.
दिलीप कुमार हे 60 च्या दशकाचे सुपरस्टार होते. रसिक त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहायचे. सायरा बानो ही त्यांच्या मोठ्या चाहत्यांपैकी एक होती. सायरा यांची आई नसीम बानो स्वत: एक अभिनेत्री होत्या.सायरा अनेकदा आईबरोबर चित्रपट पाहण्यासाठी जायच्या. एक दिवस सायरा दिलीपकुमारचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात पोहोचल्या. चित्रपटादरम्यान दिलीपकुमार यांना पडद्यावर पाहताच भारावून गेल्या होत्या.
इतकेच काय लग्न करणार तर दिलीप कुमार यांच्याशीच असा निर्धारच सायरा बानो यांनी केला होता. दिलीप कुमार यांना सायरा यांच्यात असणाऱ्या वयाच्या अंतराबाबत ठाऊक होतं. लग्न करण्यासाठी अडून बसलेल्या सायराची समजूत घालण्यासाठी दिलीप सायराला म्हणालेही होते की, तू माझे पांढरे केस पाहिले आहेत का? पण सायराने दिलेल्या उत्तरावर दिलीप यांच्याकडे काहीही उत्तर नव्हतं. त्यानंतर दिलीप यांनीही सायरा यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला.
खरे तर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच सायरा दिलीप कुमारांवर फिदा झाल्या होत्या. वयाच्या 22 व्या वर्षी सायरा बानोचे 44 वर्षांचे दिलीप कुमार यांच्याशी लग्न झाले.तेव्हापासून दोघेही इंडस्ट्रीमधील एक उत्कृष्ट जोडी बनली होती. शेवटपर्यंत सायरा बानो यांनी दिलिप कुमार यांची साथ सोडली नाही. सतत त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांच्या आजारपणातही सायरा बानो यांनी कशाप्रकारे त्यांची काळजी घेतले हे सर्वश्रृत आहे.