बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या क्रेझी चाहत्यांच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. हे चाहते आपल्या आवडत्या स्टारसाठी काही करायला तयार असतात. अगदी त्यांच्या नावाचा टॅटू काढण्यापासून तर त्यांच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावण्यापर्यंतच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. पण मृत्यूआधी कोट्यवधीची संपत्ती आपल्या आवडत्या स्टार्सच्या नावे करण्याची घटना कदाचित तुम्ही ऐकली नसेल. पण असं घडलं होतं हे नक्की. होय, २०१८ साली एका चाहतीने मृत्यूआधी आपली सगळी संपत्ती संजूबाबा अर्थात संजय दत्तच्या (Sanjay Dutt ) नावे केली होती. या चाहतीला संजय दत्त कधीही विसरणं शक्य नाही. या चाहतीचं नाव होतं निशा पाटील.
तर एकदिवस अचानक संजय दत्तला पोलिसांचा फोन आला. मुंबईतील मलबार हिल परिसरात राहणाऱ्या निशा पाटील यांनी आपला संपूर्ण बँक बॅलेन्स, संपत्ती तुमच्या नावे केली आहे, असं पोलिसांकडून संजयला सांगण्यात आलं. ते ऐकून संजय दत्तला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. तो निशा पाटील नावाच्या तरूणीला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. संजयला काहीच कळायला मार्ग नव्हता. नंतर निशा ही आपली फॅन असल्याचं त्याला कळलं.
निशा ही संजय दत्तची जबरा फॅन होती. आज ती या जगात नाही. गृहिणी असलेली निशा तिची भावंड व ८० वर्षाच्या वृद्ध आईसोबत ती राहत होती. १५ जानेवारी २०१८ रोजी दीर्घ आजाराने तिचं निधन झालं. मृत्यूआधी आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने, बॅंक बॅनेन्स असं सर्व मिळून तिने तब्बल ७२ कोटी रुपये संजयच्या नावे केले होते. निशाच्या निधनानंतर कुटुंबासमोर मृत्यूपत्राचे वाचन करण्यात आलं, तेव्हा कुठे याबद्दल सगळ्यांना कळलं. तोपर्यंत निशाने आपली सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावे केलीये, हे कुणाला ठाऊकही नव्हतं. निशा यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन आठवड्यांनी पोलिसांनी याबाबत संजयला माहिती दिली.
आपली एक चाहती आपल्या आयुष्याचं सगळं वैभव आपल्या नावे करून गेलीये, हे ऐकून संजय भारावला. पण संजय दत्त तिची संपत्ती घेऊन काय करणार होता? त्याने लगेच संबंधित बँकेशी संपर्क साधला आणि नंतर निशा पाटील यांची सर्व संपत्ती त्यांच्या कुटुंबीयांकडे तातडीने हस्तांतरित होईल अशी व्यवस्था केली. निशा या जगात नाही, पण तिला संजय कधीच विसरू शकणार नाही, ते म्हणूनच...