तर गोष्ट आहे 90 च्या दशकातली. त्या काळात फिल्मी मॅगझिनची धूम होती. आता फिल्मी मॅगझिन म्हटलं की, तसेच भडक, चमचमीत विषयही हवेत. अशात ‘सिने ब्लिट्स’ नावाच्या मॅगझिनच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. आयडिया इतकी भन्नाट की, सुपरस्टार श्रीदेवीसोबत ( Sridevi) अख्खी फिल्म इंडस्ट्री व या इंडस्ट्रीचे चाहते हैराण झाले होते. होय, अचानक श्रीदेवीची बहिण प्रभादेवी उगवली होती आणि तिचे फोटो ‘सिने ब्लिट्स’च्या कव्हरपेजवर झळकले होते.
‘मी श्रीदेवीची हरवलेली बहिण आहे...,’ असा हेडलाईन्ससह ‘सिने ब्लिट्स’च्या कव्हरपेजवरचा प्रभादेवीचा फोटो पाहून प्रत्येकजण हैराण होता. फोटो तर श्रीदेवीशी मिळताजुळता होता. पण श्रीदेवीची ही बहिण अचानक कुठून उगवली, इतकी वर्षे कुठं होती, हे काही कळेना.हा फोटो ‘सिने ब्लिट्स’च्या कव्हरपेजवर झळकला आणि जोरदार चर्चा झाली. अगदी लोक एकमेकांकडे चौकशी करू लागलेत. श्रीदेवीच्याही डोक्याचा ताप वाढला. पण ती चकार शब्द बोलेना. प्रभादेवीबद्दल प्रत्येकजण जाणून घेण्यास उत्सुक होता. पण कोणाला थांगपत्ता लागेना...
अखेर झाला खुलासा...अखेर ही प्रभादेवी कोण, याचा खुलासा झालाच आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला. होय, कारण डिक्टो श्रीदेवीसारखी दिसणारी तिची ही अज्ञात बहिण प्रभादेवी मुळात महिला नव्हतीच. तर महिलेच्या गेपअपमध्ये बॉलिवूडचा एक दिग्गज अभिनेता होता. एका अभिनेत्याला मेकअपच्या मदतीने प्रभादेवी बनवण्यात आलं होतं आणि ही कमाल केली होती मेकअप आर्टिस्ट व स्टायलिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टरने. त्याने एका अभिनेत्याला एका अभिनेत्रीचा लुक दिला होता. शिवाय फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनीही कमाल फोटोग्राफी केली होती. याच अभिनेत्याचा फोटो ‘सिने ब्लिट्स’ने प्रभादेवी नावाने कव्हरपेजवर छापला होता. चाहत्यांना ‘एप्रिल फुल’ बनवण्यासाठी हा इतका मोठा खटाटोप करण्यात आला होता. आता हा अभिनेता कोण? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. तर त्या अभिनेत्याचे नाव होते अनुपम खेर. होय, श्रीदेवीलाही काहीक्षण बुचकाळ्यात टाकणारी प्रभादेवी प्रत्यक्षात अनुपम खेर होते.