बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी मोठमोठ्या इव्हेंटमध्ये, मोठमोठ्या धनाढ्यांच्या मुलांच्या लग्नात नाचताना, परफॉर्म करताना तुम्ही पाहिलेच असेल. पण एखाद्या अभिनेत्याला चक्क अंत्यसंस्कारात रडण्याची ऑफर मिळाल्याचे तुम्ही ऐकलंय? पण हे खरं आहे. बॉलिवूडचा अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) याच्या सोबत हे रिअल लाईफमध्ये घडलेय. एका बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात चक्क रडण्यासाठी चंकीला पाच लाख रूपयांची ऑफर दिली गेली होती.
मुंबई मिररला दिलेल्या ताज्या मुलाखतीत खुद्द चंकीने हा किस्सा सांगितला. हा किस्सा आहे 2009 सालचा. त्याने सांगितले, मुलुंडच्या एका बिझनेसमॅनचे निधन झाले होते. अचानक मला त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा फोन आला. त्यांनी मला 5 लाख रूपयांची ऑफर दिली. मला करायचे काय होते तर त्या बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात चार अश्रू ढाळून दु:खी चेह-याने एका कोप-यात उभे राहायचे होते. ती ऑफर ऐकून क्षणभर हसू की रडू हेच मला कळेना. रडण्यासाठी मला कुणी 5 लाखांची ऑफर देऊ शकतं, हे माझ्यासाठी तरी धक्कादायक होतं. आता ही ऑफर का दिली गेली? त्यामागेही कारण होते.
निधन झालेल्या त्या बिझनेसमॅनच्या डोक्यावर कर्ज होते. मृत्यूपूर्वी चित्रपटात पैसे गुंतवल्यामुळे आता कर्ज चुकवणे शक्य नाही, हे आता त्याच्या कुटुंबीयांना कर्जदारांना पटवून द्यायचे होते. त्यासाठी फिल्म स्टार म्हणून मी त्यांना अंत्यसंस्कारात हवा होतो. त्यामुळे त्यांनी मला इतकी मोठी ऑफर दिली होती. पण ती ऑफर व त्यामागचे कारण ऐकल्यावर आता मी बेशुद्ध पडेल की काय अशी माझी अवस्था होती. ती ऑफर स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. मी लगेच नकार दिला. पण फोनपलीकडची व्यक्ती गयावया करू लागल्यावर मी माझी रिप्लेसमेंट म्हणून एका स्ट्रगलिंग अॅक्टरला त्यांच्याकडे पाठवले होते.
चंकीच्या जागी त्या अंत्यसंस्कारात कोणता स्ट्रगलिंग अॅक्टर गेला होता, त्याच्या नावाचा खुलासा मात्र त्याने केला नाही. पण मी त्या अॅक्टरला या ऑफरफरबद्दल सांगिल्यावर तो अगदी आनंदात जायला तयार झाला होता. चुपचाप एका कोप-यात उभे राहण्याचे 5 लाख मिळणार म्हटल्यावर तो खूश होता. कारण 5 लाख ही त्यावेळी मोठी रक्कम होती, असेही चंकी पांडेने सांगितले.
मरण्याआधी एखाद्याला मला भेटायचे असते तर त्याची अंतिम इच्छा मी जरूर पूर्ण केली असती. पण पैसे घेऊन रडणं, अंत्यसंस्काराला जाणं मी कधीही करू शकत नाही. ते माझ्या तत्त्वात बसणारं नव्हतं, असेही त्याने स्पष्ट केले.