हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना चांगलेच आवडते. त्यांनी आजवर एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांनी सुरुवातीला शराफत आणि तुम हसीन मैं जवाँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची या चित्रपटातील जोडी प्रेक्षकांना भावल्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटांमध्ये काम करत असतानाच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केले. या दोघांची प्रेमकथा खूपच रंजक आहे.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यात 13 वर्षांचे अंतर असून धर्मेंद्र यांनी लग्न करण्याच्या आधी इस्लाम धर्म स्वीकारला होता. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न होण्यामागे एक खास कारण असल्याचे म्हटले जाते. पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार, शोले या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी घडलेल्या एका किस्स्यामुळे धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्न केले. शोले या चित्रपटात धर्मेंद्र आणि हेमा यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण चेन्नईमध्ये सुरू असताना ते दोघे एकाच हॉटेलमध्ये राहिले होते. चित्रीकरण झाल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेंद्र यांच्या रूममध्ये गेले होते तर आत धर्मेंद्र आणि हेमा बेडशिटमध्ये स्वतःला गुंडाळून बसले होते. त्यावेळी दिग्दर्शकाने तशाच अवस्थेत त्यांच्यासोबत फोटो काढला. हा फोटो मीडियात आल्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा यांच्या नात्याविषयी सगळ्यांना कळले. या नंतरच त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जाते.
हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न व्हायच्याआधी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते. धर्मेंद्र यांना काही केल्या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र आपल्यी पहिल्या पत्नीला सोडणार नसल्याचे त्यांनी लग्नाच्या आधीच हेमा मालिनी यांना सांगितले होते. हिंदू धर्मात दोन लग्न करण्याची परवानगी नसल्याने धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून त्यांचे नाव दिलवार ठेवले आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले.