सनी देओल आणि गुलशन ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. एक हिरो तर दुसरा बॉलिवूडचा व्हिलन म्हणून ओळखला जातो. १९८४ साली प्रदर्शित झालेल्या 'सोहनी महिवाल' या चित्रपटात ते एकत्र झळकले होते. या चित्रपटात सनी आणि गुलशन ग्रोव्हर यांच्याबरोबर पूनम ढिल्लो आणि जीनत अमानही मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गुलशन ग्रोव्हर यांच्यामुळे सनी देओल जखमी झाला होता.
गुलशन ग्रोव्हर यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा सांगितला होता. या चित्रपटात सनी देओल आणि गुलशन ग्रोव्हर यांचा एक फायटिंग सीन होता. यासाठी खऱ्या तलवारींचा वापर केला जाणार होता. त्यामुळे गुलशन ग्रोव्हर थोडे चिंतेत होते. "भारतात पुठ्ठ्याच्या तलवारींचा वापर होतो. पण तिकडे रशियातील तलवारी धारदार होत्या," असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे शूटिंगदरम्यान गुलशन ग्रोव्हर यांच्या तलवारीने सनीच्या अंगठ्यावर वार झाला आणि तो रक्तबंबाळ झाला. यामुळे सेटवर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रसंगानंतर गुलशन ग्रोव्हर यांनी सनी देओलची अनेकदा माफीही मागितली होती.
सनी देओलला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर सनीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या प्रसंगानंतर गुलशन ग्रोव्हर प्रचंड घाबरले होते. त्यांना चित्रपटातून काढून टाकण्यात येईल, असं त्यांना वाटत होतं. पण, असं काही घडलं नाही. 'सोहनी महिवाल' हा चित्रपट भारताबरोबरच रशियातही प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७ कोटींची कमाई केली होती.