Join us

मुंबईत आले तेव्हा... बॅगेसह मी प्लॅटफॉर्मवर पडले; अभिनेत्री पर्ण पेठेची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 9:59 AM

अमिताभ बच्चन यांची निर्मिती असलेला ‘विहीर’ हा माझा पहिला चित्रपट.

मुंबई आणि पुण्याचं सख्ख्या भावंडांसारखं नातं आहे. या दोन शहरांमध्ये तुलना होऊच शकत नाही. मी पुण्याहून मुंबईला लहानपणापासून असंख्यवेळा येऊन गेलेय. अनेक नातेवाईक, आप्तस्वकीय मुंबईत असल्याने मुंबई कधीच मला नवीन किंवा अनोळखी  नव्हती. मी अगदी १७-१८ वर्षांची असल्यापासून मुंबईत एकटीने फिरत आलेली आहे. एकदा मला आठवतंय, मी एकटी एक मोठी बॅग घेऊन लोकलच्या गर्दीत कशीबशी चढले होते. बॅग सांभाळता सांभाळता माझ्या नाकीनऊ आले होते. माझं स्टेशन आल्यावर उतरताना मात्र माझी फारच गंभीर परिस्थिती झाली. मी आणि माझी बॅग.. आम्ही थेट प्लॅटफॉर्मवर फेकलो गेलो होतो. मी पार रडवेली झाले होते; पण तो तसा एखादाच अपवादात्मक अनुभव वगळता मुंबई मला खूप भावते.

अमिताभ बच्चन यांची निर्मिती असलेला ‘विहीर’ हा माझा पहिला चित्रपट. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या मुंबई गाठण्यासाठी ते एक सबळ कारण होतं. अन्यथा नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धांसाठी मी मुंबईला येऊन जाऊन होते; पण चित्रपटासाठी इथे मुक्काम ठोकणं आवश्यक होतं. ‘विहीर’ नंतर मी ‘रमा माधव’ नावाचा चित्रपट केला आणि मुंबईत रुळले. इथे सर्वांना सामावून घेण्याची भावना आहे, जी मला खूप आवडते. त्याचबरोबर हे शहर तुम्हाला जमिनीवर राहायलाही शिकवतं. तुमचा इगो तुम्हाला विसरायला लावतं. मला या शहराचा वेग फार आवडतो. हाच वेग तुम्हाला सदैव ‘ऑन द टोज’ ठेवतो. इच्छा तिथे मार्ग हा नियम या शहराला तंतोतंत लागू होतो. तुमच्यात खरोखर कलागुण असतील आणि तुमची मेहनत करायची तयारी असेल तर तुम्हाला इतकं काम मिळतं की तुम्हाला वेळ पुरणार नाही. तुम्हाला जर स्वतःला री-इन्व्हेन्ट करायचं असेल, तर मुंबईत तुम्ही ते यशस्वीपणे करू शकता.- शब्दांकन : तुषार श्रोत्री

टॅग्स :मुंबईसिनेमाअमिताभ बच्चन