अभिनेत्री जयाप्रदा यांचे खरे नाव ललिता राणी आहे. चित्रपटांत आल्यानंतर त्यांनी जयाप्रदा हे नाव धारण केले. ३ एप्रिल म्हणजेच त्यांचा आज वाढदिवस असून १९६२ मध्ये आंध्रातील राजाहमुंडरी येथे त्यांचा जन्म झाला. जयाप्रदा यांचे वडील कृष्णा राव हे तेलगू चित्रपटांचे फायनान्सर होते. जयाप्रदा यांनी तेलगू चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘भूमिकोसम’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी जयाप्रदा यांना केवळ १० रूपये मानधन मिळाले होते.
सुरुवातीपासूनच जयाप्रदा यांचे आयुष्य रहस्यांनी भरलेले राहिले. १९८६ मध्ये जयाप्रदा यांचे फिल्मी करिअर अत्त्युच्च शिखरावर असताना त्यांनी अचानक लग्नाचा निर्णय घेतला. तेही तीन मुलांचा बाप असलेल्या निर्माता श्रीकांत नाहटा यांच्याशी. ८० च्या दशकात जयाप्रदा आघाडीच्या अभिनेत्री होत्या. पण याचदरम्यान त्यांच्या घरी इनकम टॅक्सची रेड पडली. हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यांत वाईट काळ होता. रेड पडल्यानंतर जयाप्रदा यांच्या करिअरचा ग्राफ अचानक खाली आला. याकाळात श्रीकांत नाहटा यांनी जयाप्रदांना साथ दिली.
यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे प्रेम. पण श्रीकांत नाहटा आधीच विवाहित होते. पण जयाप्रदा नाहटांच्या प्रेमात जणू वेड्या होत्या. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता अखेर नाहटांनी जयाप्रदांशी लग्न केले. ही बातमी सगळ्यांसाठी धक्कादायक होती. विशेष म्हणजे, जयाप्रदांसोबत लग्न केल्यानंतरही श्रीकांत नाहटा यांना पहिल्या पत्नीपासून मूल झाले. एकंदर काय तर लग्न करूनही जयाप्रदा या कायम एकट्या राहिल्या. जयाप्रदा यांना मूल नसल्याने त्यांनी बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण केले.
लग्नानंतरही जयाप्रदा चित्रपटांत काम करू लागल्या. पण हळूहळू त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले. त्यांनी छोट्या पडद्यावरही काम केले होते. पुढे १९९४ मध्ये जयाप्रदा यांनी तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला. पुढे समाजवादी पक्षात प्रवेश केला. २००४ व्या लोकसभा निवडणुकीत जयाप्रदा रामपूरमधून निवडून आल्या आणि लोकसभेत पोहोचल्या. पण २०१० मध्ये कथितरित्या पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाने त्यांना बडतर्फ केले. त्यामुळे मार्च २०१४ मध्ये जयाप्रदा यांनी राष्ट्रीय लोकदलाचा झेंडा हाती घेतला आणि सरतेशेवटी भाजपात सामील झाल्या.