राज कुमार हे बॉलिवूडचं मोठ नावं. दिग्गज अभिनेते राज कुमार (Rajkumar) आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे किस्से, त्यांच्या आठवणी आजही चाहते आवडीनं वाचतात. राज कुमार व नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या ‘तिरंगा’ या सिनेमाच्या सेटवरचा किस्साही असाच. राज कुमार व नाना दोघेही तोडीस तोड कलाकार. शिवाय तोडीस तोड फटकळ. याचमुळे दोघांचं परस्परांशी अजिबात पटायचं नाही. तरिही दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी या दोन्ही कलाकारांना चित्रपटात एकत्र आणण्याचं धाडस दाखवलं होतं आणि याच सिनेमाचं नाव होतं ‘तिरंगा’. ((Tirangaa))मेहुल यांनी एका मुलाखतीत या सिनेमाबद्दल तसेच नाना व राज कुमार यांच्याबद्दल सांगितलं होतं. 1993 साली प्रदर्शित ‘तिरंगा’ सुपरहिट ठरला. सिनेमात नाना व राज कुमार यांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळाली. पण पडद्यामागे ही केमिस्ट्री कशी होती तर दोघेही सेटवर एकमेकांशी बोलणं दूर तर चक्क एकमेकांकडे पाठ करून बसायचे.
नानांनी सुरूवातीला दिला होता नकार...‘तिरंगा’साठी राज कुमार यांचं नाव फायनल होतं. दुस-या भूमिकेसाठी मेहुल कुमार यांना नाना हवे होते. पण राज कुमार म्हणजे पूर्व आणि नाना म्हणजे पश्चिम हे त्यांना ठाऊक होते. अनेकांनी मेहुल यांना या दोघांना एका सिनेमात घेणं जिकरीचं असल्याचं सांगत, असं न करण्याचा सल्ला दिला होता. पण मेहुल कुमारांना नानाचं हवे होते. त्यांनी नानांना फोन केला आणि सिनेमाबद्दल सांगितलं. नानांनी थेट नकार दिला. मी कमर्शिअल सिनेमे करत नाही, म्हणत त्यांनी स्पष्ट नकार दिला. पण मेहुल कुमारही पिच्छा सोडणाºयांपैकी नव्हतेच. एकदा स्क्रिप्ट ऐका तर, अशी विनंती त्यांनी केली आणि नाना तयार झालेत. मेहूलकुमार स्क्रिप्ट ऐकवायला नानांच्या घरी पोहोचलेत. नानांना स्क्रिप्ट आवडली आणि त्यांनी सिनेमाला होकार दिला. पण अर्थात त्यांची एक अट होती.
काय होती ती अट...सिनेमासाठी राज कुमार यांचं नाव फायनल झाल्याचे नानांना ठाऊक होतेच. त्यामुळे त्यांनी या सिनेमासाठी अट ठेवली. राज कुमार यांनी माझ्या कामात जराही हस्तक्षेप केला तर मी त्या क्षणी चित्रपट सोडणार. जे काही नुकसान होईल, त्याला मी जबाबदार असणार नाही, असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट सांगितलं. मेहुल कुमार यांनी ही अट अर्थातच मान्य केली.
अन् तिकडे राजकुमार संतापलेनानाचा होकार मिळताच मेहूलकुमार यांनी लगेच राजकुमार यांना फोन करून ही बातमी दिली. पण नाना पाटेकर यांचं नाव ऐकताच राजकुमार प्रचंड चिडले. त्याला कशाला घेतलं? सेटवर तो शिवीगाळ करतो असं ऐकलं आहे, असं ते म्हणाले. अर्थात तरीही ते सिनेमात काम करण्यासाठी तयार झालेत.
सेटवर एक शब्दही बोलायचे नाहीत...अखेर तो क्षण आलाच. शूटींग सुरु झाले आणि नाना व राज कुमार एकत्र आलेत. साहजिकच पहिल्या दिवशी प्रचंड टेन्शन होतं. कशावरूनही बिनसलं तर अख्खा सिनेमा रखडणार, हे माहित असल्याने मेहुल कुमार दक्ष होते. सेटवर सर्वांनाच याची कल्पना होती. पण हळूहळू टेन्शन विरलं. कारण नाना व राज कुमार सेटवर एकमेकांशी चकार शब्दही बोलायचेदेखील नाहीत. दोघंही एकमेकांपासून दूर एकमेकांकडे पाठ करून बसत. परस्परांबद्दल काहीसा राग होता. पण दोघांनाही आपली परस्परांबद्द्द्लच्या मतांचा परिणाम आपल्या कामावर होऊ दिला नाही. दोघांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. आजही हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो.