अमिताभ बच्चन यांनी मला मारण्याचा केला होता प्रयत्न, या अभिनेत्रीने केला होता आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 07:30 PM2020-03-08T19:30:00+5:302020-03-08T19:30:02+5:30
अमिताभ यांनी माझ्या मागे गुंड लावले असून मला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे या अभिनेत्रीने सांगितले होते.
सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हॉट, ग्लॅमरस, बोल्ड परवीन बाबी यांनी सिनेप्रेमींना अक्षरश: वेड लावले होते. परवीन बाबी अतिशय लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पण स्वप्नांचा ध्यास घेतलेल्या परवीन यांनी हार मानली नाही. २३ वर्षांच्या वयात परवीन मॉडेलिंगमध्ये आल्या. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होत्या. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यावेळी परवीन यांनी मिनी स्कर्ट घातला होता आणि त्यांच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीन यांचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी परवीन यांना आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीन यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. यानंतर दीवार, नमक हलाल, अमर अकबर अँथोनी, शान यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट परवीन यांनी दिले.
परवीन बाबी यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. महेश भट, डॅनी डेन्झोपा, कबीर बेदी यांच्यासोबतची त्यांची प्रेमप्रकरण चांगलीच गाजली. पण त्याचसोबत परवीन बाबी यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर काही वर्षांपूर्वी एक आरोप लावला होता. अमिताभ बच्चन यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ही गोष्ट त्या काळात मीडियात चांगलीच गाजली होती.
परवीन भाभी आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडायची. त्या काळात दिलेल्या एका मुलाखतीत परवीन बाबी यांनी या इंडस्ट्रीत तुझे प्रेरणास्त्रोत कोण आहेत असे विचारले असता दिलीप कुमार, संजीव कुमार, जया बच्चन, मीना कुमारी, वहिदा रहमान आणि अमिताभ बच्चन यांची नावं घेतली होती. अमिताभ यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले याची परवीन यांनी कबुली देखील दिली होती. पण परवीन बाबी यांनी त्यांच्या निधनाच्या काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, अमिताभ यांनी त्यांच्या मागे गुंड लावले असून त्यांना मारण्याचा अमिताभ प्रयत्न करत आहेत. पण त्याकाळात परवीन यांनी मानसिक संतुलन ढासळले असल्याने लोकांनी त्यांच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते.