बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील (smita patil). प्रचंड अभ्यासू आणि तितक्याच ताकदीने अभिनय सादर करणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. स्मिता पाटील यांनी बॉलिवूड अभिनेता राज बब्बर यांच्यासोबत लग्न केलं होतं. राज बब्बर आणि स्मिता यांची लव्हस्टोरी जवळपास सगळ्यांनाच ठावूक आहे. राज यांचा हा दुसरा विवाह होता. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या लग्नाचा परिणाम त्यांची पहिली पत्नी नादिरा यांच्यावर झाला होता. एकीकडे त्यांना त्रासही झाला होता. पण,त्यांनी या सगळ्यामध्ये स्मिता यांची बाजू समजून घेतली होती. एका मुलाखतीमध्ये त्यांनी राज आणि स्मिता यांच्या लग्नावर भाष्य केलं होतं. सध्या सोशल मीडियावर त्यांची जुनी मुलाखत चर्चेत आली आहे.
अलिकडेच राज आणि स्मिता यांचा मुलगा प्रतिक बब्बर याने त्याचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला नादिरादेखील उपस्थित होत्या. त्यांना प्रतिकसोबत पाहिल्यानंतर त्यांच्याविषयी पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्य चर्चा रंगली. यामध्येच ही जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याविषयी भाष्य केलं.
राज बब्बर यांनी स्मिता पाटीलसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी नादिराची साथ सोडली होती. राज बब्बर यांच्या या वर्तनामुळे लोकांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं होतं. परंतु, स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर पुन्हा त्यांच्या पहिल्या पत्नीकडे नादिराकडे परतले होते. सुरुवातीला राज आणि स्मिता यांच्या अफेअरच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. परंतु, त्या अफवा समजून नादिराने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण, ज्यावेळी त्यांना सत्य समजलं त्यावेळी त्या प्रचंड खचून गेल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये त्यांनी या नात्याविषयी भाष्य केलं.
"स्मिता मला खूप क्लोज होती. त्यावेळी तिला माझ्या नवऱ्याची गरज होती. तिच्या माझ्या नवऱ्यासोबत अफेअर होतं. पण, मला खात्री होती की त्यांच्या नात्यामुळे माझ्या संसारात कोणताही अडथळा येणार नाही. स्मिता एकटी होती त्यामुळे सहाजिकच ती साथ मिळावी यासाठी माझ्या नवऱ्याच्या जवळ ओढली गेली", असं नादिरा म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "घराच्या बाहेर सुद्धा त्यांच्यावर (राज बब्बर) कोणीतरी प्रेम करणारं आहे हे पाहून मी खूश होते. जर ते खूश असतील तर मी सुद्धा खूश आहे. माझ्या नवऱ्यासोबत भावनिकरित्या गुंतवून घेण्यापासून ती स्वत:ला रोखू शकली नसेल कदाचित."
दरम्यान, स्मिता पाटील यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये नादिरा यांच्याविषयी भाष्य केलं होतं. "बोलणं खूप सोपं आहे पण प्रत्यक्षात तिच्यासाठी हे सगळं सोपं नाही. तिला एकटेपणा जाणवत असेल ती खूप त्रासातून जात असेल", असं स्मिता पाटील म्हणाल्या होत्या.