बॉलिवूडचे स्टार किड्स अनेकदा चर्चेत असतात. पाहताना असं वाटतं की स्टार किड्सना कोणताही संघर्ष करावा लागत नसेल, परंतु प्रत्येक व्यक्तीची स्वतःची आयुष्याची कहाणी असते. अशीच एक कहाणी बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनची आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी रवीना टंडन एकेकाळी स्टुडिओमध्ये साफसफाईचे काम करायची. स्वतः रवीनाने एका मुलाखतीदरम्यान याबाबत खुलासा केला आहे.
रवीना टंडननं १९९१ मध्ये पत्थर के फूल या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. ती फिल्ममेकर रवि टंडन यांची कन्या आहे. आपण चित्रपटसृष्टीत असलेल्या कुटुंबातून येत असलो तरी इंडस्ट्रीत काम अॅड फिल्ममेकर प्रल्हाद कक्कर यांच्यामुळे मिळण्यास सुरूवात झाल्याची माहिती तिनं दिली. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपला जीवनप्रवास उलगडला आहे. करिअरच्या सुरूवातील आपल्याला कशाप्रकारे साफसफाईचं काम करावं लागत होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला अनेकदा उलटीही लाफ करावी लागली होती, असं तिनं सांगितलं.
“मी साफसफाईच्या कामापासून करिअरला सुरुवात केली हे सत्य आहे. माझं काम बाथरुम आणि स्टुडिओच्या जमिनीवर उलटी साफ करण्याचं होतं. कदाचित मी १० वी उत्तीर्ण झाल्यावर प्रल्हाद कक्कर यांना असिस्ट करण्यास सुरूवात केली. तेव्हा लोक मला तू कॅमेऱ्याच्या पाठी काय करते असं विचारत होते. ते मला कॅमेऱ्याच्या समोर यायला सांगायचे. पण मी आणि अभिनेत्री बनेन असं सांगत असे. मी या क्षेत्रात अभिनेत्री बनेन असा कधी विचारही केला नव्हता,” असं ती म्हणाली.
कशी झाली एन्ट्री?यावेळी रवीनानं प्रल्हाद कक्कर यांच्याकडे इन्टर्नशिपच्या वेळचा किस्साही सांगितला. “जेव्हा प्रल्हाद कक्कर यांच्या सेटवर कोणी मॉडेल येत होते, तेव्हा ते रवीनाला बोलवा असं सांगत. नंतर ते मला मेकअप करायला लावायचे आणि मला पोझ द्यायला सांगायचे. तेव्हा मलाच हे करायचं असेल तर मोफत का करावं आणि यातून पॉकेटमनीही मिळू शकतो असा विचार मी केला. यामुळेच मी मॉडेलिंग सुरू केलं. त्यानंतर मला चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या. तेव्हा मला अॅक्टिंग, डान्सिंग, डायलॉग डिलिव्हरी काहीही येत नव्हतं. मी काळानुसार बदल घडवला आणि मी शिकले आहे,” असंही रवीनानं म्हटलं.