बॉलिवूडच्या काही प्रेमकथांची चर्चा आजही होते. अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha)यांची प्रेमकहाणी त्यापैकीच एक. खरे तर रेखा यांचे नाव अनेकांशी जोडले गेले. पण अमिताभ व रेखा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आजही होते. म्हणूनच आजही कुठल्या समारंभात रेखाची एन्ट्री झाली की, पाठोपाठ मीडियाचे कॅमेरे अमिताभ यांचे हावभाव टिपण्यासाठी वळतात. असे म्हणतात की, रेखा अमिताभवर जीवापाड प्रेम करायच्या. ( Rekha Amitabh Bachchan Love Story) ‘मुकद्दर का सिकंदर’ या सिनेमाचे शूटींग सुरु असताना अमिताभ व रेखा यांच्या अफेअरची कुणकुण मीडियाला लागली आणि या लव्हस्टोरीबद्दलच्या अनेक बातम्या रंगू लागल्या. ‘सिलसिला’मध्ये रेखा यांनी अमिताभच्या गर्लफ्रेन्डची भूमिका साकारली तर जया बच्चन यांनी अमिताभच्या पत्नीची. पण या सिनेमानंतर अचानक अमिताभ व रेखा एकमेकांपासून दुरावले. अमिताभ यांनी रेखांपासून एक अंतर निर्माण केले, ते कायमचे.
अमिताभ यांनी कधीच रेखांवरच्या प्रेमाची कबुली दिली नाही. पण रेखा मात्र ही कबुली द्यायला घाबरल्या नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी अगदी बेधडकपणे अमिताभ यांच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली होती.सिमी गरेवाल यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत रेखा अमिताभ यांच्याबद्दल बोलल्या होत्या. ‘दो अंजाने या चित्रपटासाठी अमितजींना साईन केले आहे, हे ऐकून मी ठार वेडी झाले होते. त्यांच्यात असे काही होते, ते मी इतक कुणामध्येही कधीही पाहिले नव्हते. एका व्यक्तीत इतके गुण एकत्र कसे असू शकतात, असा प्रश्न मला पडला होता,’असे रेखा या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
तुम्ही अमितजींच्या प्रेमात पडल्या होत्या का? या सिमीच्या प्रश्नावर उत्तर देताना रेखा यांनी आपल्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. अमितजींना पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो. अगदी लहान मुलांपासून तर स्त्रियांपर्यंत सगळेच. अशात मी सुद्धा त्यांच्या प्रेमात पडण्यापासून स्वत:ला कसे रोखणार होते. मी त्यांच्या प्रेमात पडले, असे त्या म्हणाल्या होत्या.अर्थात कपल असण्याची चर्चा त्यांनी नाकारली होती. यावर रिलेशनशिपची गोष्ट तुम्ही कधी नाकारली का नाही? असा प्रश्न सिमी यांनी केला असता, मी काय नाकारू? मी कधीच त्यांच्या प्रेमात नव्हते हे नाकारू? निश्चितपणे मी त्यांच्या प्रेमात आहे. जगभरातील प्रेम घ्या, त्यात आणखी थोडी भर घाला. तेवढं पे्रम मी त्यांच्यावर करते... पण आमच्यात कधी कोणतेच नाते नव्हते. कधीच नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.