बॉलिवूडच्या इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi). सौंदर्य आणि अभिनय यांच्या जोरावर श्रीदेवीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आजवर त्यांचे अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यामुळे आजही त्यांचं नाव इंडस्ट्रीत मानाने घेतलं जातं. श्रीदेवीने तिच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं. यात जितेंद्र, ऋषी कपूर, अनिल कपूर यांसारख्या कलाकारांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. परंतु, तिच्यासोबत अशी एक घटना घडली ज्यानंतर तिने संजय दत्तसोबत कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला. सध्या श्रीदेवी आणि संजय दत्त यांचा जुना किस्सा चर्चिला जात आहे.
श्रीदेवी आणि जितेंद्र यांची मुख्य भूमिका असलेला 'हिम्मतवाला' हा सिनेमा अनेकांच्या लक्षात असेल. हा सिनेमा त्याकाळी बराच गाजला होता. परंतु, याच सिनेमाच्या सेटवर संजय दत्तने दारुच्या नशेत बराच गदारोळ माजवला होता. इतकंच नाही तर त्याने श्रीदेवीला बरंच काही सुनावलं होतं. ज्यामुळे तिने संजयसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता.
संजय दत्तने नुकतीच इंडस्ट्रीत त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. तर, श्रीदेवी त्याकाळी टॉप अॅक्ट्रेस होती. अशामध्येच एकदा श्रीदेवीच्या हिम्मतवाला या सिनेमाचं शूट सुरु होतं आणि संजय थेट दारुच्या नशेत या सिनेमाच्या सेटवर पोहोचला. इतकंच नाही तर तो श्रीदेवीच्या मेकअप रुममध्ये शिरला आणि तिला शिवीगाळ केली.
नेमकं काय घडलं श्रीदेवीसोबत?
दारुच्या नशेत असलेला संजय दत्त हिम्मतवालाच्या सेटवर पोहोचला आणि त्याने श्रीदेवीला भेटण्याची मागणी केली. परंतु, त्याची ही अवस्था पाहून सेटवरच त्याला आडवण्यात आलं. त्यावेळी श्रीदेवी तिच्या मेकअप रुममध्ये होती. संजयला या गोष्टीची माहिती मिळाल्यावर तो तिच्या मेकअप रुमजवळ गेला आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागला. त्याचं असं वागणं पाहून श्रीदेवी घाबरुन गेली आणि सुरुवातीला तिने दरवाजा उघडण्यास नकार दिला.
दरवाजा न उघडल्यामुळे संजय आणखीनच संतापला. शेवटी श्रीदेवीने दरवाजा उघडला आणि संजय तिच्या मेकअप रुममध्ये शिरला. यावेळी त्याने तिला बरंच खरंखोटं सुनावलं. त्याचं हे वागणं पाहून सेटवरच्या लोकांनी त्याला मेकअप रुममधून बाहेर काढलं.
श्रीदेवीने घेतला मोठा निर्णय
कोणतीही ओळख नसतांनाही संजयने केलेलं हे कृत्य पाहून श्रीदेवी चांगलीच संतापली होती. त्यामुळे तिने संजयसोबत कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला. या मधल्या काळात तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या होत्या. परंतु, त्यात संजय दत्त आहे या एका कारणामुळे तिने अनेक ऑफर्स रिजेक्ट केल्या. परंतु, १९९३ मध्ये गुमराह या सिनेमात ती संजयसोबत झळकली होती. मात्र, सेटवर ती कायम संजयपासून अंतर राखून होती.
दरम्यान, खुदागवाह या सिनेमासाठी श्रीदेवी आणि संजय दत्त या जोडीला घ्यावं अशी मेकर्सची इच्छा होती. मात्र, श्रीदेवीने यासाठी नकार दिला.