Join us

हा सिनेमा मी बनवून दाखवणारंच...! जेव्हा शाहिद कपूरने केली होती डिंकोसिंग यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:43 AM

 Dingko Singh Biopic : सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाले होते. दिग्दर्शकाचीही निवड झाली होती. पण पुढे...

ठळक मुद्दे१९९८ मध्ये डिंको यांना अर्जुन व २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविले. डिंको यांनी भारतीय नौदलात सेवा दिली.

आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णविजेते तसेच भारतीय बॉक्सिंगला नवी दिशा देणारे बॉक्सर डिंकोसिंग ( Dingko Singh ) यांचे काल गुरुवारी वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. २०१७ पासून त्ते यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते.  ५४ किलोगटात(बँटम वेट) खेळणारे डिंको यांना गेल्या वर्षी कोरोनाची लागणही झाली होती, पण त्यांनी या विषाणूवर मात केली होती. डिंकोसिंग यांच्या निधनावर अभिनेता शाहिद कपूर ( Shahid Kapoor ) याने शोक व्यक्त केला आहे. २०१९ मध्ये शाहिद डिंकोसिंग यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवणार होता. याद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्याचा त्याचा विचार होता.

शाहिदने स्वत: डिंकोसिंग  यांच्या बायोपिकचे संकेत दिले होते. एका मुलाखतीत तो यावर बोलला होता. आपल्याकडे डिंकोसिंग यांच्यावर सिनेमा बनवण्याचे अधिकार असल्याचे त्याने म्हटले होते. सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाले होते. दिग्दर्शकाचीही निवड झाली होती. ‘एअरलिफ्ट’ व ‘शेफ’ सारखे सिनेमे दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन हा सिनेमा दिग्दर्शित करणार होते आणि लीड रोलमध्ये शाहिद कपूर दिसणार होता. पण पुढे या सिनेमाचे काम रखडले, ते आत्तापर्यंत.अर्थात शाहिद कपूरने म्हटल्याप्रमाणे, हा सिनेमा तो बनवणारचं. आता डिंकोसिंग या जगात नाहीत. त्यांना श्रद्धांजली म्हणून शाहिद या जबरदस्त बायोपिकचे काम सुरु करेन, अशी अपेद्वा करायला हरकत नाही.

 दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन म्हणाले...दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन  यांनी डिंकोसिंग यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. डिंकोसिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला मोठा धक्का बसला. ते आजारी होते, हे मला ठाऊक होते. पण इतके वाईट होईल, याची अपेक्षा नव्हती. ते हयात असताना आम्ही त्यांच्यावरचा सिनेमा बनवू शकलो नाही. काही कारणास्तव सिनेमा रखडला. निश्चितपणे त्यांच्यावरचा सिनेमा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. सिनेमा रखडला होता, पण डिंकोसिंग यांनी कधीच हा सिनेमा का रखडला, असे एका शब्दानेही विचारले नाही. पण आता हा सिनेमा बनायलाच हवा. हा सिनेमा त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मेनन म्हणाले.

टॅग्स :शाहिद कपूरआत्मचरित्र