Join us

या कारणामुळे शेखर सुमन गेला होता डिप्रेशनमध्ये, जगण्याची इच्छा नव्हती अशी दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 8:00 AM

शेखरच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याची जगण्याची इच्छाच उरली नव्हती असे त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

ठळक मुद्देशेखरचा मोठा मुलगा आयुषला एक गंभीर आजार झाला होता आणि त्याची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली आणि काहीच दिवसांत त्याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर अलका आणि शेखर दोघेही डिप्रेशनमध्ये गेले होते.

शेखर सुमन त्याच्या कारकिर्दिच्या सुरुवातीला उस्तव, त्रिदेव, रणभूमी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकला होता. शेखरने चित्रपटांसोबतच अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. देख भाई देख, एक राजा एक राणी, कभी इधर कभी उधर अशा त्याच्या अनेक मालिका गाजल्या आहेत. त्याचे सिम्पली शेखर, मुव्हर्स अँड शेखर्स असे अनेक चॅट शो देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. शेखरचे लग्न अलका सोबत झाले असून त्यांचा मुलगा अध्ययनने देखील काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात प्रवेश केला आहे.

शेखर आणि अलका यांचा प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांची ओळख १९८२ ला दिल्ली युनिर्व्हसिटीमध्ये झाली होती. अलकाला पाहाताच तिच्या सौंदर्याच्या मी प्रेमात पडलो होतो अशी कबुली शेखरने दिली होती. एवढेच नव्हे तर अलकाने शेखरला पाहाताच याच व्यक्तीसोबत लग्न करायचे असे मनोमन ठरवले होते. अलका आणि शेखरने काहीच वर्षांच्या नात्यानंतर लग्न केले होते. अलका त्यावेळी फॅशन डिझायनर म्हणून काम करू लागली होती तर शेखर दिल्लीतील श्री राम सेंटरमध्ये काम करत होता. शेखर आणि अलकाचे लग्न १९८४ मध्ये झाले होते. सुरुवातीला सगळे काही सुरळीत सुरू होते. पण शेखरला अभिनयक्षेत्रात काम मिळत नसल्याने त्यांच्यासाठी सगळ्याच गोष्टी खूप कठीण झाल्या होत्या. 

अलका कमवत असलेल्या पैशांवर घर चालत होते. आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असतानाच त्यांचा मोठा मुलगा आयुषला एक गंभीर आजार झाला आणि त्याची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली आणि काहीच दिवसांत त्याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर अलका आणि शेखर दोघेही डिप्रेशनमध्ये गेले होते.

त्याविषयी शेखर सांगतो, आयुष आमच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर आम्हाला दोघांना देखील जगण्याची इच्छा उरली नव्हती. पण याच घटनेने मला आणि अलकाला जास्त जवळ आणले असे मला वाटते. 

शेखर आणि अलका या दुःखातून स्वतःला सावरत असताना देख भाई देख ही शेखरची मालिका हिट झाली. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. शेखरची कमाई चांगली होत असल्याने अलकाने काम करणे सोडले आणि सगळे लक्ष अध्ययनकडे दिले. 

टॅग्स :शेखर सुमन