बोलके डोळे, त्यातली वेगळीच चमक आणि डोळ्यांच्या अभिनयातून सांकेतिक अभिनय करण्याचं सामर्थ्य असलेल्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील.भारतीय सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील ( Smita Patil). त्यांनी रसिकांना हसवलं.. रडवलं... इतकंच नाही तर चिंतन करायलाही भाग पाडलं.व्यक्तीरेखांच्या भावना, त्यांचं व्यक्तीमत्व आपल्या दमदार आणि सशक्त अभिनयातून त्यांनी इतक्या प्रभावीपणे मांडल्या की त्यावेळी प्रचलित सौंदर्याच्या साऱ्या व्याख्या त्यांच्यापुढे फिक्या वाटू लागल्या. मराठी भाषेचा उंबरठा ओलांडत ज्या अभिनेत्रीनं हिंदी रसिकांनाही वेड लावलं त्या स्मिता पाटील.
एकीकडे चित्रपटसृष्टीत कारकीर्द बहरत असताना राज बब्बर( Raj Babbar) यांच्याशी लग्न करुन त्यांनी संसार थाटला. मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांचा संसार आणि कारकीर्द प्रसुतीच्या वेळी झालेल्या निधनामुळे अधुरी राहिली. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र आपल्या आईचा चेहरा पाहण्याचा आणि तिच्यासह खेळण्याचं भाग्य त्या बाळाला लाभलं नाही. तो बाळ म्हणजेच अभिनेता प्रतीक बब्बर.
स्मिता पाटील यांच्यासह काहीतरी अघटीत घडणार असल्याची कुणकुण अभिनेता अनु कपूर यांना आधीच लागली होती. अनु कपूर यांनी स्मिता पाटील यांच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यासाठी हे वर्ष थोडं कठीण ठरु शकते. त्यामुळे सांभाळून राहा अशा सुचनाही दिल्या होत्या.खुद्द अनु कपूर यांनीच त्यांचा शो 'सुहाना सफर विद अनु कपूर' मध्ये सांगितला होता.
सत्यजीत रे यांच्या मालिकेत अनु कपूर आणि स्मिता पाटील यांनी काम केले होते. अनु कपूर यांनी स्मिता पाटील यांच्या पतीची भूमिका साकारली होती. ‘26 जानेवारी 1986 साली दोघेही कोलकाताहून मुंबईला परत येत होते. त्यावेळी स्मिता पाटील यांच्या सांगण्यावरुनच त्यांनी त्यांचा हात बघितला. त्याचवेळी अनु कपूर यांनी स्मिता पाटील यांना सावध राहण्यास सांगितले होते. काही महिन्यानंतर लगेचच स्मिता पाटील यांच्या निधनाची बातमी आली होती.
अकाली निधनानंतरही स्मिता पाटील यांच्या नावाचा डंका जगभर वाजत होता. मॉस्को, न्यूयॉर्क आणि फ्रान्समधल्या विविध महोत्सवात त्यांच्या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं.आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक आणि समीक्षकांकडून दाद मिळवणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या होत्या.