कोरोना काळात थिएटर बंद होते. त्यामुळे प्रदर्शनासाठी तयार असलेले चित्रपट आता थिएटर सुरू झाल्यानंतर एका मागोमाग रिलीज होत आहे. यात हिंदीशिवाय मराठी आणि साउथच्या चित्रपटांचाही समावेश आहे. मागील आठवड्यात 'चंद्रमुखी' आणि 'शेर शिवराज' हे मराठी चित्रपट रिलीज झाले. या आठवड्यातही बरेच चित्रपट रिलीज होणार आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हिडीओ दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
महेश टिळेकर यांनी फेसबुकवर थिएटरचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मराठी प्रेक्षक गेले कुठे? प्रदर्शनाआधी भरपूर प्रसिद्धी करून सिनेमाची हवा करण्यात आलेला आणि नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट मी रिलीजच्या पहिल्या दिवशीच थिएटरमध्ये जाऊन पाहिला. त्यावेळी साधारण शंभर एक प्रेक्षक होते. वाटलं आज पहिला दिवस असल्यामुळे कदाचित प्रेक्षक कमी असतील.पण चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस झाले तसे या चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून आणि डिजिटल मीडियाने सातत्याने बातम्यामधून या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून करोडो रुपयांचा गल्ला या सिनेमाने जमवला आहे अशी माहिती दिली. ते पाहून माझ्या ओळखीच्या ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला नव्हता त्यांना मी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघायचा आग्रह केला. सिनेमाला गर्दी असणार म्हणून ऑनलाईन तिकीट आधी बुक करा असेही सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की, आज माझे दोन मित्र अॅडव्हान्स बुकिंग न करताच अंधेरीतील मल्टिप्लेक्समध्ये हा सिनेमा पहायला गेले.तर संपूर्ण थिएटरमध्ये ते दोन मित्रच. बाकी प्रेक्षकच नाही. त्यांनी तिथूनच मला फोन करून सांगितलं " तुम्ही तर सांगत होता गर्दी असणार आधी तिकीट बुक करा, पण इथे तर प्रेक्षकच नाही, बरं झालं ऑनलाईन तिकीट नाही बुक केलं नाहीतर जास्त पैसे गेले असते". त्यांचं बोलणं ऐकून मला वाटलं कदाचित ते माझी थट्टा करत असतील. मी त्यांना तसे बोलूनही दाखवले. रोज सोशल मीडियावर ज्या सिनेमाच्या विक्रमी कलेक्शन बद्दल बातम्या येतायेत, ते खोटं कसं असेल? बरं ऑनलाईन बुक माय शो वर तर या सिनेमाला ८०% पेक्षा जास्त रिस्पॉन्स असल्याचं दाखवतायेत. मग हे सगळं खोटं कसं असू शकेल?.मित्राने लगेच थिएटरमध्ये प्रेक्षक किती आहे ते दाखवण्यासाठी मोबाईल वर व्हिडिओ शूट करून मला पाठवला.तो व्हिडिओ पाहून माझी खात्री पटली. सिनेमाच्या इंटरव्हलमध्ये परत फोन करून त्याने मला सांगितलं की आधी ते दोघेच होते नंतर आणखी चारजण आले. चारमधील, एक वयोवृद्ध जोडपे होते आणि दुसरे जोडपे जे आले होते ते सिनेमापेक्षा थिएटरमधील अंधाराचा व्यक्तिगत आनंद घेण्यासाठी आल्याचे दिसत होते. करोडो रुपये खर्च करून बनविण्यात आलेला आणि त्यावर करोडो रुपये पब्लिसिटी खर्च केलेल्या सिनेमाला बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक यावे हे त्या चित्रपटाच्या संपूर्ण टीम विशेषतः कलाकारांसाठी किती दुःखदायक असेल. त्या सिनेमाला प्रेक्षक नाही हे त्या सिनेमाचं दुर्दैव की प्रेक्षक जबाबदार????, असेही त्यांनी म्हटले.