अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) जानेवारी, २०२१ मध्ये मेहुल पै (Mehul Pai)सोबत लग्नबंधनात अडकली. लग्नाला वर्ष पूर्ण होण्याआधीच मेहुलला कॅन्सर (Cancer) झाल्याचे निदान झाले. हे समजल्यावर कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. मेहुलवर सध्या कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. तो आता ठीक असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती अभिज्ञाने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिली होती. अभिज्ञाने नुकतेच इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी ती मेहुलच्या आजाराबद्दल बोलताना भावुक झाली. या लाइव्हमध्ये अभिज्ञाच्या अनेक चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी तिला तिचा पती मेहुल पै आणि त्याच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.
एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारले, “घरचे कसे आहेत”? त्यावर अभिज्ञा भावूक झाली आणि म्हणाली, मी काही महिन्यांनंतर इंस्टाग्रामवर लाइव्ह येण्याचा निर्णय घेतला कारण मी माझ्या खासगी समस्यांमध्ये व्यस्त होते. मला बरे वाटत नव्हते पण आता मला वाटते की मी ठीक आहे. मेहुलच्या तब्येतीबद्दल विचारणाऱ्यांना तिने पुढे म्हटले की, “तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी तुमचे आभार. घरी सर्वजण ठीक आहेत. मेहुलसुद्धा ठीक आहे. मेहुल बरा होत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कदाचित एक-दोन महिन्यांत तो पूर्णपणे बरा होईल. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मला तुमच्या प्रेमाची गरज आहे.