दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अचानक जगातून एक्झिट घेतली. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांचं कुटुंब तर अद्यापही या धक्क्यातून सावरलेलं नाही. सतीश कौशिक यांच्या मागे त्यांच्या पत्नी आणि १० वर्षाची मुलगी वंशिका आहे. सतीश एक अभिनेते होते, दिग्दर्शक होते, शिवाय निर्मातेही होते. त्यांचा प्रचंड मोठा व्याप होता. त्यांच्यानंतर त्यांचा हा व्याप कोण सांभाळणार, असा प्रश्न आहेच. आता सतीश यांचा पुतण्या निशांत कौशिक याने याचं उत्तर दिलं आहे.
आज तकला दिलेल्या मुलाखतीत निशांत यावर बोलला. तो म्हणाला, काकांनी कधीच मला पुतण्या समजलं नाही. ते मला स्वत:चा मुलगा मानायचे. वडिलांसारखं प्रेम द्यायचे. मला घडवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी मला सर्वात मोठा ब्रेक दिला. सतीश कौशिक एंटरटेनमेंटचा प्रोड्यूसर बनवलं. आम्ही गेल्या १२ वर्षांपासून एकत्र काम करत होते. त्यांनी मला इंडस्ट्रीतले अनेक बारकावे शिकवले. ते अचानक गेल्याने मी काहीसा गोंधळलाे आहे. पण काकांचे मित्र बोनी कपूर, अनुपम खेर, अशोक पंडित आमच्या मदतीला आहेत.
आता काकू सर्व सांगाळणार...काकांची सगळी स्वप्नं पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती पूर्ण करणार. माझी काकू सतीश यांच्या पत्नी आता कंपनीच्या चेअरपर्सन असतील. मी काकांसोबत काम करत होतो, तसाच काकूंसोबत करत राहिल. आमचे काही प्रोजेक्ट्स आहेत, ते आम्ही पूर्ण करू. शो मस्त गो ऑन म्हणतात, तसंच आमची कंपनी सुरू राहिली. काकूला काम समजायला वेळ लागेल, पण मी त्यांच्या मदतीला सतत तत्पर असेल, असंही निशांत म्हणाला.
निशांत कौशिक यांने सतीश कौशिक यांच्या शेवटच्या इच्छेबद्दलही सांगितलं. स्वतःचा एक भव्य स्टुडीओ असावा अशी काकांची शेवटची इच्छा होती. आता त्यांच्या निधनानंतर मी निशांत अभिनेते अनुपम खेर आणि बोनी कपूर यांच्या मदतीने भव्य स्टुडीओची स्थापना करणार आहे, असं तो म्हणाला.