सध्या हर हर शंभू हे गाणं प्रत्येकाच्या ओठावर आहे. फार क्वचितच कोणी असेल ज्यानं हे गाणं ऐकलं नसेल. पाहता पाहता हे गाणं युट्यूबवरबी ट्रेंड करू लागलंय. दरम्यान, गायिका फरमानी नाझनंदेखील हे गाणं गायलं आणि त्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात सापडली.
फरमानी नाझच्या गाण्यालाही मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले होते. परंतु हर हर शंभू या गाण्याची मूळ गायिका ही फरमानी नाझ नाही असं तुम्हाला सांगितलं तर? याचं मूळ गाणं तिच्या गाण्याच्या काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. या गाण्याचे मूळ गायक अभिलिप्सा पांडा आणि जीतू शर्मा हे आहेत. पाहूया नक्की कोण आहे अभिलिप्सा पांडा.
कोण आहे अभिलिप्सा?ज्या प्रकारे हर हर शंभू या गाण्यानं फरमानी नाझला प्रकाशझोतात आणलं तसंच अभिलिप्सालाही प्रसिद्धी मिळवून दिली. अभिलिप्सानं आजवर अनेक गाणी गायली आहेत. परंतु हर हर शंभू या गाण्यानं तिला प्रसिद्धी मिळवून दिली. ती ओदिशाची राहणारी आहे. तिचे वडील निवृत्त सैनिक आहेत, तर आई शिक्षिका आहे. गायन क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कायमच तिच्या कुटुंबीयांकडून तिला प्रोत्साहन मिळालं. अभिलिप्साचे आजोबा ओदिशातील परिचित कथाकार होते. तसंच ते हार्मोनिअम वाजवण्यासाठीही प्रसिद्ध होते. अभिलिप्सानं ४ वर्षाची असल्यापासूनच आपल्या आजोबांकडून गायनाचे धडे घेण्यास सुरूवात केली. ती एक क्लासिकल डान्सरदेखील आहे. तिची एक लहान बहिणदेखील असून तीही संगीत क्षेत्राशीच निगडित आहे.
मल्टिटॅलेंडेड आहे अभिलिप्सा१८ वर्षीय अभिलिप्सा ही मल्टिटॅलेंटेड आहे. गायिका, नृत्यांगना याशिवाय ती मार्शन आर्ट आणि कराटेचीही एक्सपर्ट आहे. तिला ब्लॅक बेल्ट देखील मिळालाय. २०१९ मध्ये नॅशनल लेव्हल कराटे चॅम्पिअनशिपमध्ये तिला सुवर्ण पदकही मिळालं होतं. इतकंच नाही तर, ती स्टेट लेव्हल डिबेटरही आहे. नुकतीच तिनं १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
कसं मिळालं गाणं?२००१ मध्ये तिनं ओदिशा सुपर सिंगर स्पर्धेत भाग घेतला होता. अभिलिप्साच्या कराटेच्या ट्रेनरनी तिची जीतू शर्माशी भेट करून दिली होती. त्यानंतर त्यांची गाण्यावर चर्चा झाली आणि रेकॉर्डिंग केलं गेलं, असं तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.