'अमर सिंह चमकिला' सिनेमाची सर्वांना उ्त्सुकता आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमाची ट्रेलरपासूनच उत्सुकता शिगेला आहे. अभिनेता दिलजीत दोसांजने या सिनेमात अमर सिंह चमकिला यांची भूमिका साकारली आहे. पंजाबी लोकांच्या मनामनात स्वतःचं स्थान निर्माण करणारे अमर सिंह चमकिला नक्की कोण होते? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अमर सिंह चमकिला यांचा जन्म २१ जुलै १९६० रोजी पंजाबमधील डुगरी गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. याशिवाय त्यांनी कापड गिरणीत काम केले आणि गाणीही लिहिली. त्यांनी रेकॉर्ड केलेल्या 'टाकुए ते टाकुआ' हे गाणं लोकप्रिय झालं. 'चमकिला' या स्टेजच्या नावाने ते पंजाबच्या खेड्यापाड्यात प्रसिद्ध झाले. अनेक महिला गायकांसोबत डूएट गाणं गायल्यानंतर त्यांना अमरज्योत कौर यांच्यानिमित्ताने गायनाचा आणि आयुष्याचा जोडीदार मिळाला.
चमकीला लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांचा मृत्यू झाला. चमकिला आणि त्यांची पत्नी पंजाबमधील मेहसमपूर येथे त्यांच्या शोसाठी कारमधून उतरत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या या जोडप्याची निर्घृणपणे हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. अद्याप या प्रकरणाचा छडा लागला नाही. गायक अमित त्रिवेदी चमकिला यांना ‘पंजाबचे एल्विस’ म्हणून संबोधतात. अमर सिंह चमकिला यांची लोकप्रियता इतकी होती की 365 दिवसांत त्यांनी 366 शो केले आहेत.
चमकिला यांनी विवाहबाह्य संबंध, वय, मद्यपान, अंमली पदार्थांचा वापर आणि पंजाबी पुरुषांच्या सवयी यावर गाणी लिहिली. 'पेहले ललकरे नाल', 'बाबा तेरा ननकाना', 'तलवार में कलगीधर दी' असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. चमकीला आणि अमरजोत यांचा 1980 चा 'अल्बम जिजा लक मिने' आणि 1981 साली आलेला 'हिक उठे सो जा वे' अल्बममध्ये अनेक सुप्रसिद्ध गाणी आहेत. दिलजीत दोसांज आणि परिणीती चोप्राची भूमिका असलेला 'अमर सिंह चमकिला' सिनेमा १२ एप्रिलला रिलीज होणार आहे.