सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येने अवघी सिनेसृष्टीच नाही तर देशभरात खळबळ उडाली आहे. मोठमोठ्या सिनेमांचे सेट असोत की राजकीय पक्षांचे की दिल्लीतील राजपथावरील महाराष्ट्राच्या रथांचे... नितीन देसाई हे नाव सर्वांच्या परिचयाचे होते. कर्जतमध्ये त्यांचा मोठा स्टुडिओ होता, या स्टुडिओतच त्यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. यामागचे कारण कर्जतचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले आहे.
रायगडचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्राथमिक माहिती दिली की, 'आज सकाळी श्री नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकताना ND स्टुडीओमध्ये आढळून आला आहे. आम्ही सर्व पैलू तपासून पाहत आहोत.' यानंतर काही वेळातच आमदार बालदी यांनी नितीन देसाई हे आर्थिक तंगीमुळे त्रस्त झाले होते. या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
बालदी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, महिनाभरापूर्वीच मी नितीन देसाई यांना भेटलो होतो. त्यांनी आपण आर्थिक तंगीमुळे तणावात असल्याचे सांगितले होते. त्यांच्या आत्महत्येमागे हेच मुख्य कारण असेल असे मला वाटत आहे. नवीन सिनेमे येत आहेत, परंतू एनडी स्टुडिओमध्ये फक्त टीव्ही मालिकांचेच शुटिंग होताना दिसत आहे, यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारताना दिसत नाही, असे नितीन मला म्हणाले होते, असे बालदी यांनी म्हटले आहे.
नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य 'एनडी स्टुडिओ' त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके नम' अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. 'देवदास','खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.