प्रशांत दामले (Prashant Damle ) यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. अनेक सिनेमे, मालिका आणि अनेक गाजलेल्या नाटकांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रशांत दामले प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. एक दिग्गज नाट्य निर्माते अशीही त्यांची एक ओळख आहे. गेल्या काही वर्षापासून प्रशांत दामले मराठी सिनेमांऐवजी केवळ रंगभूमीवरच काम करताना दिसत आहेत. यामुळे प्रेक्षकांची निराशा होणं स्वाभाविक आहे. पण प्रशांत दामलेंनी सिनेमा का सोडला? यामागे मोठं कारण आहे.अलीकडे ‘थिंक बँक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुद्द यामागचं कारण सांगितलं. 1978 साली प्रशांत दामलेंनी पहिल्या नाटकात काम केलं आणि 1992 साली त्यांनी पूर्णवेळ नाटकाला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. या काळात आपण अभिनेता होऊ असं त्यांना कुठंही वाटलं नव्हतं. याचं कारण म्हणजे, अभिनयापेक्षा त्यांना गायनात रस होता. 1992 साला दरम्यान ‘गेला माधव कुणीकडं’ हे नाटक हाऊसफुल्ल झालं आणि त्या हाऊसफुलच्या बोर्डानं असा काही आत्मविश्वास दिला की, त्यानंतरच्या काळात सिनेमा आणि मालिका न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
ते म्हणाले,‘कुठलाही व्यवसाय हा पैसे कमावण्यासाठी आहे. पण पैसे कमावताना त्यासोबत आनंद मिळाला तर तो आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मानसिक आनंद मोजता येत नाही. पण तुमच्या चेह-यावर तो दिसतो. चित्रपट, मालिका यामध्ये भरपूर पैसे मिळतात. कदाचित प्रसिद्धी देखील भरपूर मिळते. परंतु माझं ते ध्येय नाही. मला रंगभूमीवरच काम करायला अधिक आवडतं. या ठिकाणी काम करताना मला मानसिक आनंद अधिक मिळतो. या आनंदाला मोल नाही. त्यामुळे आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर पैशांसोबतच मानसिक शांतता देखील महत्वाची असते. त्यामुळे 20 वर्षांपूर्वी मी रंगभूमीवरच करिअर करण्याचा निर्णय घेतला.’मी 2008 साली नाट्य निर्माता झालो. स्वत:च्या पायावर उभं राहण्याची वेळ आलीये,असा विचार करून मी नाट्य निर्मिती क्षेत्राकडे वळलो. या दरम्यान खूप काही शिकलो. अनुभव गाठीशी होते आणि या जोरावर मी पुढे गेलो, असेही त्यांनी सांगितले.प्रशांत दामले सध्या ‘तू म्हणशील तसं’ हे नव्या नाटकामध्ये काम करत आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत प्रसाद ओक, संकर्षण क-हाडे, भक्ती देसाई हे देखील महत्वाची भूमिका साकारत आहेत.