बॉलिवूडमधील कलाकार किती श्रद्धाळू असतात याचा अनुभव आपण बऱ्याचदा घेतला आहे. कोणी एका ठराविक विश्वासमुळे सिनेमा एका विशिष्ट तारखेला रिलीज करतात. तर कोणी नावात अथवा आडनावात बदल करतात. बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध अभिनेते - दिग्दर्शक राकेश रोशन यांनी अशीच एक शपथ घेतलीय. ती म्हणजे डोक्यावर केस कधीही न उगवण्याची. राकेश रोशन यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांनी का घेतलीय शपथ? काय आहे यामागील कारण? जाणून घ्याच
म्हणून राकेश रोशन यांनी केलं मुंडन
राकेश रोशन यांनी बॉलिवूडमधील एक काळ त्यांच्या हलक्याफुलक्या सिनेमांनी गाजवला आहे. 'खुबसुरत', 'खट्टा मिठा' हे राकेश रोशन यांचे सिनेमे प्रचंड गाजले. राकेश यांनी काही काळानंतर अभियातून ब्रेक घेऊन दिग्दर्शनाकडे त्यांचा मोर्चा वळवला. 'माझा पहिला सिनेमा हिट झाला तर मी मुंडन करेन', अशी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती. १९८७ साली आलेल्या 'खुदगर्ज' सिनेमाचं दिग्दर्शन राकेश यांनी केलं. हा सिनेमा सुपरहिट झाल्याने राकेश यांनी मुंडन केलं. त्यानंतर आजतागायत राकेश यांनी डोक्यावर केस उगवले नाहीत.
राकेश यांना K अक्षरावरही खास प्रेम
राकेश रोशन यांनी आणखी एक विश्वास बाळगला. तो म्हणजे नावापुढे K अक्षर लावायचा. झालं असं की, १९८४ ते १९८६ काळात 'भगवान दादा', 'जाग उठा इंसान' हे राकेश यांचे सिनेमे आपटले. त्यादरम्यान राकेश यांना एक निनावी पत्र आल्याचं सांगितलं जातं. तुमचे 'खट्टा मिठा', 'खंडन' हे सिनेमे सुरुवातीला असलेल्या K अक्षरामुळे हिट झाले. राकेश यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केलं. परंतु जेव्हा त्यांचे सिनेमे फ्लॉप झाले तेव्हा मात्र त्यांनी पत्रात दिलेला सल्ला गांभीर्याने घ्यायचा विचार केला. त्यांनी 'खुदगर्ज', 'खून भरी मांग', 'काला बाजार', 'कोई मिल गया', 'क्रिश', 'क्रिश ३' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं. या सर्व सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करुन सुपरहिटचा टॅग मिरवला.