कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेणाऱ्यांमध्ये सगळ्यात वरचं नाव म्हणजे अभिनेता आमीर खान. भूमिकेला न्याय देण्यासाठी आमीर काहीही प्रयोग करायला तयार असतो. त्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं.
आमीरच्या या कामाप्रती असलेली निष्ठा नव्या कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळेच नवे आणि उद्योन्मुख कलाकार त्याला आपला आदर्श मानतात. आमीर खानला आदर्श मानून स्वतःच्या भूमिकेवर मेहनत घेणाऱ्यांच्या कलाकारांमध्ये अभिनेता सुमेध मुदगलकरचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. कृष्णाच्या भूमिकेद्वारे वाढती लोकप्रियता मिळविणारा सुमेध आपली भूमिका अधिकाधिक उत्तम व्हावी, यासाठी सतत प्रयत्नशील असतो. ‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारताना त्यानं आमीरलाच डोळ्यासमोर ठेवलं.
'राधाकृष्ण'च्या सेटवर सुमेध जणू काही आमीर खानच बनला. कारण त्याने रास लीलाचा एक सीन अगदी अचूक व्हावा, यासाठी तब्बल 20 वेळा शॉट दिले होते. अचूक आणि भूमिकेला साजेसं आणि तितकंच प्रभावी काम व्हावं यासाठी आमीरकडून प्रेरणा घेत असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. प्रत्येक अभिनेत्यालाच अचूक शॉट द्यावा, असं वाटत असतं आणि कोणत्याही भूमिकेसाठी आपलं 100 टक्के योगदान द्यावं यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्याने म्हटले होते.
रसिकांनी कृष्ण म्हणून स्वीकारलं असेल तर त्यात प्राण ओतून ती जिवंत करणं हे तो आपलं कर्तव्य मानतो. रासलीलेचा एक सीन चित्रीत करताना राधेची भूमिका रंगविणारी अभिनेत्री मल्लिका हिच्याबरोबर नृत्य करायचं होतं, त्याचं चित्रीकरणही झालं होतं. मात्र चित्रीत झालेल्या सीनमध्ये आपली कामगिरी स्वतःलाच आवडली नव्हती तर ती रसिकांना कशी आवडेल असा प्रश्न सुमेधला पडला. त्यामुळेच तो सीन अचूक, योग्य वाटेपर्यंत त्याने २० रिटेक घेतले. सुमेधच्या या कामावरील निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.