Rohit Shetty Birthday: चित्तथरारक स्टंट्स, रंगबेरंगी सेट्स, फायटींग सिक्वेन्स, अॅक्शन कॉमेडी असा सगळा मसाला देणारा रोहित शेट्टी बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आहे. गोलमाल, सिंघम अशा सुपरहिट चित्रपटाचे सिक्वेल्स तयार करून रोहित शेट्टीने बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रोहित शेट्टीच्या मसाला चित्रपटात एक गोष्ट कॉमन दिसते. ती म्हणजे मराठी कलाकार. होय, रोहितच्या प्रत्येक सिनेमात मराठी कलाकार असतातच. रोहित शेट्टी मराठी कलाकारांना कायम संधी देतो. इतकंच नाही तर त्यांना दर्जेदार भूमिका देतो. रोहितने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने मराठी कलाकारांना संधी देण्यामागचं कारण सांगितलं होतं.
तुझ्या चित्रपटात मराठी कलाकार दिसतात, त्यामागे नेमकं काय कारण आहे, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर त्याने तो म्हणाला होता की, 'मी मराठी कलाकारांना चित्रपटात का घेतो? हा प्रश्न मला अनेक ठिकाणी विचारला जातो. यामागे एक खास कारण आहे. मराठी कलाकार खरंच खूप साधे असतात. त्यांचा अभिनय कमालीचा असतोच, पण असं असूनही त्यांच्यात कुठलाही अहंकार नसतो. चांगला अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार मी पाहिले आहेत. परंतु, मराठी कलाकार याला अपवाद आहेत. त्यांच्यात एक खास गुण आहे, तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मराठी कलाकारांना माझी कायम पसंती असते.’ आमचे चित्रपट १०० कोटींचा बिजनेस करतात, यातला ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो. त्यामुळेच माझ्या चित्रपटात मराठी कलाकार नेहमीच असणार ’, असंही तो म्हणाला होता.
रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर आणि अश्विनी काळसेकर या मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. याआधी सुपरहिट ठरलेल्या सिंघम चित्रपटात अशोक सराफ, सोनाली कुलकर्णी आणि विजय पाटकर झळकले होते. तर गोलमाल सीरिजमध्ये मराठोमोळ्या श्रेयस तळपदेने मुख्य भूमिका साकारली होती. रणवीर सिंगच्या सिंबा चित्रपटात सिद्धार्थ जाधवची भूमिकाही लक्ष वेधून घेणारी ठरली होती, याशिवाय या चित्रपटात वैदेही परशुरामीनेही अभिनय साकारला होता.