Join us

‘बाहुबली’नंतर ‘मिल्की गर्ल’ तमन्ना का झाली गायब?, आता 'या' सिनेमातून करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 4:17 PM

' बाहुबली द बिगिनिंग' सिनेमात बाहुबलीच्या खांद्याला खांदा लावून युद्ध आणि प्रेमाच्या मैदानात लढणाऱ्या अवंतिका ही भूमिका अभिनेत्री तमन्ना ...

'बाहुबली द बिगिनिंग' सिनेमात बाहुबलीच्या खांद्याला खांदा लावून युद्ध आणि प्रेमाच्या मैदानात लढणाऱ्या अवंतिका ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने साकारली होती. मिल्क या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या तमन्नाची भूमिका साऱ्यांनाच भावली होती. 'बाहुबली- द कन्क्लूजन’ सिनेमातही तमन्नाने भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमात तिच्या भूमिकेला तितकासा वाव नव्हता. या सिनेमात अनुष्का शेट्टीची भूमिकाच भाव खाऊन गेली. तमन्नाचं फारसं अस्तित्त्व या सिनेमात जाणवलं नाही. तमन्नाला सारेच दक्षिण भारतीय सिनेमातून प्रसिद्धीला आलेली अभिनेत्री समजतात. मात्र 'बाहुबली' या सिनेमातून रसिकांची मनं जिंकणारी तमन्ना ही हिंदी चित्रपटसृष्टीनेच दिलेली नायिका आहे. तमन्नाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात हिंदी सिनेमातूनच केली आहे.

२००५ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'चाँद सा रोशन चेहरा' या सिनेमातून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. मात्र तिचा पहिलाच सिनेमा तिकीटखिडकीवर आपटला. सिनेमाला रसिकांनी नाकारल्याने तमन्नाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमाकडे वळवला. दक्षिणेकडील सिनेमात तिची प्रत्येक तमन्ना म्हणजेच इच्छा पूर्ण झाली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना नाव चांगलंच हिट ठरलं, तिच्या सिनेमांना दक्षिणेकडील डोक्यावर घेतलं. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला. दक्षिणेत नाव कमावल्यानंतर बॉलीवुडमध्ये नाव कमावण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती २०१३ साली मुंबईत आली.

साजिद खान दिग्दर्शित हिम्मतवाला सिनेमातून अजय देवगणसारख्या बड्या कलाकारासह तिने हिंदीत पुनरागमन केलं. त्यावेळी तमन्ना हिम्मतवालामधून हिंदीत पदार्पण करत असल्याचे साजिदने सांगितले होते. मात्र तिने याआधीही हिंदीत काम केल्याची बाब लपवण्यात आली. यानंतर तमन्ना अक्षय कुमारसह 'एंटरटेनमेंट' सिनेमात झळकली. यानंतर २०१५ साली बाहुबली- द बिगिनिंगमधून रुपेरी पडद्यावर झळकली.

तमिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा बनवला होता तरी यांच्या हिंदी डब व्हर्जनने देशभरातील रसिकांना वेड लावलं. हा सिनेमासुद्धा तमन्नाचा हिंदी सिनेमा नव्हता. २०१६ साली ती सोनू सूदसह तुतक तुतक तुतिया सिनेमात झळकली. मात्र हा सिनेमा काही चालला नाही. सध्या ती कन्नड सिनेमा केजीएफ चॅप्टर-१ मधील आयटम साँगमुळे चर्चेत आहे. यानंतर ती सुपरनॅचरल थ्रिलर खामोशी सिनेमात प्रभूदेवासह रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.. 

टॅग्स :तमन्ना भाटियाबाहुबली