Join us

आमीरला पुरस्कार देऊन वाया कशाला घालवायचा - प्रियदर्शन

By admin | Published: April 08, 2017 4:21 PM

दुस-या अभिनेत्याला पुरस्कार मिळवण्याची संधी असताना आमीरला देऊन कशाला वाया घालवायचा असं प्रियदर्शन बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - अभिनेता अक्षय कुमारला रुस्तम चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली असून लवकरच त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. एकीकडे अक्षय कुमारचे चाहते अक्षय कुमारचं कौतुक आणि अभिनंदन करताना थकत नसून दुसरीकडे अक्षय कुमारच्या तुलनेत इतर अभिनेते कसे वरचढ होते यावरुनही काहीजणांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन ज्यांच्यासोबत अक्षय कुमारने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, ते ज्युरीमध्ये असल्यानेच अक्षयला हा पुरस्कार घोषित झाल्याचा आरोपही काहीजण करत आहेत. 
 
(26 वर्षात पहिल्यांदाच अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार)
 
प्रियदर्शन यांनी मुंबई मिररला मुलाखत देत निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-यांना उत्तर दिलं आहे. "अक्षय कुमार पात्र असल्यानेच त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. माझ्यासोबत ज्युरीमध्ये एकूण 38 सदस्य होते. इतक्या लोकांच्या निर्णयावर तुम्ही प्रश्नचिन्ह कसं काय उपस्थित करु शकता ? मागील वर्षी रमेश सिप्पी ज्युरी प्रमुख होते. "पिकू"साठी अमिताभ बच्चन यांना पुरस्कार दिला तेव्हा कोणीही प्रश्चचिन्ह उपस्थित का केले नाहीत ?", असा सवाल प्रियदर्शन यांनी विचारला आहे. 
 
अक्षय कुमारला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर युद्द सुरु झालं होतं. दंगलसाठी आमीर खान, पिंकसाठी अमिताभ बच्चन आणि अलिगढसाठी मनोज वाजपेयी पर्याय असतानाही अक्षय कुमारला पुरस्कार का देण्यात आला असे प्रश्न विचारण्यात येत होते. यावर स्पष्टीकरण देताना "अक्षय कुमारचं रुस्तम आणि एअरलिफ्ट चित्रपटातील काम लक्षात ठेवूनच हा पुरस्कार त्याला देण्यात आल्याचं", प्रियदर्शन यांनी सांगितलं. "ज्युरीने दोन्ही चित्रपटांसाठी त्याची नोंद घेतली होती. पण एकाच चित्रपटासाठी पुरस्कार देऊ शकत असल्याने आम्ही रुस्तम निवडला", असं प्रियदर्शन बोलले आहेत. 
 
आमीर खानने दंगल चित्रपटात उत्तम काम केलं असतानाही त्याला पुरस्कार का दिला गेला नाही ? असं विचारलं असता, "आमीरने आपणास पुरस्कार जाहीर झाल्यास स्विकारण्यासाठी जाणार नसल्याचं सांगितलं होतं. जेव्हा "तारे जमीन पर"ला उत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला होता तेव्हाही आमीरने उपस्थिती लावली नव्हती. मग दुस-या अभिनेत्याला पुरस्कार मिळवण्याची संधी असताना कशाला वाया घालवायचा", असं प्रियदर्शन बोलले आहेत. प्रियदर्शन यांच्या या वक्तव्याचा अर्थ काढल्यास आमीर खान वैयक्तिक हजर राहणार नसल्याने त्याला पुरस्कार दिला गेला नाही असा होत आहे. पुरस्कार मिळवण्यासाठी ही अट आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
विेशेष म्हणजे प्रियदर्शन यांच्या संपुर्ण मुलाखतीत कोठेही उडता पंजाब चित्रपटाचा उल्लेख नव्हता.