ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - बॉलिवूडची बॉम्बशेल बिपाशा बसू अखेर विवाहबंधनात अडकणार आहे. बिपाशा आणि अभिनेता करणसिंग ग्रोव्हर यांच्या रिलेशनची गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू असून त्या दोघांनी कधीच उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही. मात्र सोशल मीडियावरील त्यांचे फोटो, त्यांनी एकत्र घालवलेल्या व्हेकेशन्स आणि प्रत्येक इव्हेंटला एकत्र लावलेली हजेरी यावरूनच ते दोघे एकमेकांच्या किती प्रेमात आहेत, ते सहज समजते. इतक्या कावावधीच्या या रिलेशननंतर अखेर बिपाशा-करण दोघेही विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाले असून पुढच्या महिन्यात, म्हणजेच २९ एप्रिलला त्यांचे लग्न होणार असल्याचे वृत्त 'डीएनए'ने दिले आहे.
दिनो मोरिया, जॉन अब्राहम आणि हरमन बावेजा या तिघांनाही डेट केल्यानंतर अखेर आता करणच्या रूपात बिपाशाला खरा जीवनसाथी मिळाला आहे. तर सध्या तरूणींचा हार्टथ्रॉब बनलेला करण त्याच्या कॅसानोव्हा इमेजसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी त्याची दोन लग्नं झाली असून टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत नुकताच झालेला त्याचा घटस्फोट खूप गाजला. मात्र असे असले तरी बिपाशा आणि करणने आता आपला दु:खद भूतकाळ मागे ठेवून नवी सुरूवात करण्याचा निर्णय घेतला असून दोघांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या विवाहाला मंजूरी दिल्याने ते वडीलधा-यांच्या आशिर्वादाने २९ एप्रिलला लग्नबंधनात अडकतील.
खरंतर बिपाशाला ग्रँड वेडिंग हवे होते, मात्र करणच्या आईने नुकतीच या विवाहाला दिलेली मंजुरी, याआधी त्यांचा बिपाशाला असलेला विरोध तसेच करणचा नुताच झालेला घटस्फोट या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर फक्त आप्तस्वकीय आणि काही मोजक्या मित्रांच्या उपस्थिती हे लग्न पार पडेल, असे समजते.
कसा असेल लग्नसोहळा :
- २८ एप्रिलला जुहूमधील 'व्हिला ६९' या लाऊंज बारमध्ये मेहेंदीचा कार्यक्रम पार पडेल.
- २९ एप्रिलला बिपाशाच्या खारमधील घरी मोजक्याच लोकांच्या उपस्थित बंगाली पद्धतीने बिपाशा-करणचा विवाह पार पडेल.
- त्याचदिवशी संध्याकाळी लोअर परळच्या सेंट. रेजीस हॉटेलमध्ये बिपाशा-करणच्या बॉलिवूडमधील सेलब्रिटी मित्रांसाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासह तसेच अभिनेता आर.माधवन पत्नीसह या रिसेप्शनला हजर राहणार आहे. पुढील आठवड्यात सर्वांना रिशेप्शनचे निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.
- बिपाशाचा बेस्ट फ्रेंड असलेला डिझायनर रॉकी एस हा बिपाशा व करणचा विवाहाचा पोशाख डिझाईन करणार आहे.