Join us

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ खरंच ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:38 PM

कोरोना आला, पाठोपाठ लॉकडाऊन आला आणि ‘झुंड’चे पोस्ट प्रॉडक्शनचे काम थांबले....

ठळक मुद्देअक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब, रणवीर सिंगचा 83, अमिताभ यांचा गुलाबो सिताबो असे अनेक मोठे सिनेमे ओटीटीवर रिलीज होणार असल्याचे मानले जात आहे. 

सैराट, फँड्रीसारखे अप्रतिम मराठी सिनेमे देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हिंदी सिनेमा येणार म्हटल्यावर चाहते उत्सुक होते. ‘झुंड’ची घोषणा झाली आणि चाहते उत्सुक झालेत. महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘झुंड’ साकारणार म्हटल्यावर तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. नागपुरच्या विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा कधी एकदा प्रदर्शित होतो, असे चाहत्यांना झाले. शूटींग झाले आणि 8 मे 2020 ही प्रदर्शनाची तारीखही ठरली. पण त्याआधीच कोरोना व्हायरसचा हाहाकार माजला आणि ‘झुंड’च्या प्रदर्शनावर भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. होय, कोरोना आला, पाठोपाठ लॉकडाऊन आला आणि ‘झुंड’चे पोस्ट प्रॉडक्शनचे काम थांबले. लॉकडाऊन उघडल्यानंतर ‘झुंड’चे हे काम पूर्ण होईलच. पण त्यापूर्वीच नागराज यांचा हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार अशी बातमी आली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद आहेत.  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची आकडेवाडी, त्याचे गांभीर्य बघता लॉकडाऊन उठणार कधी आणि चित्रपटगृह उघडणार कधी, याबद्दल तूर्तास तरी साशंकता आहे. अशात अनेक बिग बजेट सिनेमे थिएटर्सऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार अशी चर्चा आहे.   ‘झुंड’ हा सिनेमाही ओटीटीवर रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर अ‍ॅमेझॉन प्राईमने ‘झुंड’चे हक्क विकत घेतल्याचीही चर्चा आहे.

अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब, रणवीर सिंगचा 83, अमिताभ यांचा गुलाबो सिताबो असे अनेक मोठे सिनेमे ओटीटीवर रिलीज होणार असल्याचे मानले जात आहे. यात एक नाव ‘झुंड’चेही आहे. अर्थात तूर्तास नागराज वा अ‍ॅमेझॉनने या चर्चेला दुजोरा दिलेला नाही. पण हो या चर्चेने नागराज यांचे काही दर्दी चाहते मात्र काहीसे निराश झाले आहेत. 

नागराज यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यात एक वेगळी मजा आहे. अशात तो ऑनलाईन रिलीज झाला तर सगळी मजाच जायची, अशा प्रतिक्रिया चाहते व्यक्त करू लागले आहेत. अर्थात अद्याप सगळी चर्चा आहे. नागराज याबद्दल खुलासा करत नाही तोपर्यंत तरी ही अफवाच मानायला हवी.

टॅग्स :नागराज मंजुळेअमिताभ बच्चन