Join us

एस श्रीसंत 'नच बलिये सिझन 9' मध्ये झळकणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 15:48 IST

लवकरच 'नच बलिये'शोचे 9 वे पर्व सुरू होणार आहे. या सिझनमध्ये कोणकोणते कपल्स दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. तसेच शाहिद कपूर आणि मीरा राजपुत या शोला जज करणार असल्याची चर्चा आहे.

क्रिकेटर-एक्टर एस श्रीसंत लवकरच चाहत्यांना एक गुड न्युज देणार आहे. 'नच बलियेच्या 9' सिझनमध्ये श्रीसंत आपल्या बलियेसह ठुमके लावणार असल्याचे बोलले जात आहे. एका मुलाखतीत खुद्द श्रीसंतनेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. पत्नी भुवनेश्वरीसह त्याला 'नच बलिये'ची ऑफर मिळाल्याचे त्याने सांगितले आहे. मात्र  2013च्या इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा आरोप श्रीसंतवर होता.सुप्रीम कोर्टाने श्रीसंतवर असलेली आजीवन बंदी हटवली असून बीसीसीआयला यावर पुनर्विचार करण्याचे आदेशही दिले आहेत. यावर अजूनतरी बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यानुसार बीसीसीआयच्या निर्णयानंतरच शोमध्ये झळकायचे की नाही याचा निर्णय श्रीसंत घेणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

तर दुसरीकडे  बंदी उठवल्यानंतर श्रीसंतला मैदानावर परतण्याचे वेध लागले आहेत.त्यामुळे श्रीसंत क्रिकेट मैदानावर कि डान्सच्या मंचावर आपली कमाल दाखवणार हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. बिग बॉस  12व्या सिझनमध्ये झळकण्यापूर्वी श्रीसंत 'झलक दिखला जा' आणि 'खतरों के खिलाड़ी' शोमध्ये झळकला होता. खरंतर बिग बॉस शोमध्ये झळकल्यानंतर श्रीसंतची  सा-याच वयोगटातील रसिकांमध्ये अधिक लोकप्रियता वाढल्याचे पाहायला मिळाले.

36 वर्षीय श्रीसंत गेली पाच वर्ष क्रिकेटपासून दूर आहे.  न्यायालयाच्या निर्णयानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना श्रीसंत म्हणाला की,''इतक्या वर्षांनंतर आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलेय हे मलाही माहित नाही. गेली सहा वर्ष मी क्रिकेट खेळलेलो नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवत बीसीसीआय मला स्थानिक क्रिकेट खेळण्याची परवानगी देईल, अशी मी आशा बाळगतो. आता तरी मला शाळेच्या क्रिकेट ग्राऊंडवर जाऊन प्रशिक्षण देता येईल आणि तेव्हा तुला परवानगी नाही, असे मला कोण म्हणणार नाही. क्रिकेट हे माझे आयुष्य आहे आणि मला ते परत हवंय.'' 

टॅग्स :नच बलिये