मार्व्हल स्टुडिओच्या ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी’ या हॉलिवूडपटातील जबरदस्त पॉप्युलर असलेले ‘ग्रूट’ हे पात्र तुम्हाला माहीतच असेल. ‘आय अॅम ग्रूट’ या डायलॉगमुळे हे पात्र हिट ठरले. याच लोकप्रिय पात्राला ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी’च्या दुसऱ्या भागात विन डिझलने आवाज दिला आहे. मानवसदृश झाड असलेल्या या पात्राचा मर्यादित शब्दसंग्रह असल्याने त्याच्या तोंडून पडणारे ‘आय अॅम ग्रूट’ हे शब्द पहिल्या भागात हिट झाले होते. आता दुसऱ्या भागात बेबी ग्रूट दिसणार असल्याने त्याचेही डायलॉग प्रेक्षकांना भावतील यात शंका नाही. या पात्राविषयी विन डिजल सांगतो, मी केविन फिगला दोन आठवड्यांपूर्वी भेटण्यास गेलो होतो. त्यावेळी मार्व्हलने मला एक संकल्पना पुस्तक पाठविले होते. या पुस्तकात अनेक विचित्र कल्पना आणि पात्र होती. मी जेव्हा हे संपूर्ण पुस्तक वाचले तेव्हा ‘गू्रट’ या पात्राच्या प्रेमात पडलो. तेव्हा मी माझा तीन वर्षांचा मुलगा विन्सेटला विचारले की, कुठले पात्र मी साकारायला हवे. तेव्हा त्याने झाडाकडे इशारा केला. त्याचवेळी मी ‘ग्रूट’ या पात्राला आवाज देण्याचे ठरविले. वास्तविक विनला ‘ग्रूट’ या पात्राविषयी विशेष प्रेम आहे. याविषयी तो सांगतो, ‘ग्रूट’ हे पात्र रहस्यमय असून मजेशीर आहे. माझ्या मते मार्व्हल युनिव्हर्समध्ये हे एकमेव असे पात्र आहे, जे सगळ्यात वेगळे आहे. मार्व्हलनिर्मित ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी २’ हा चित्रपट मागच्या भागाला पुढे नेत आहे. या चित्रपटातील सुपरहिरोंची टीम ब्रह्मांडाच्या आणखी बाहेर जात असते. गार्डियन्सच्या टीमला नवीन परिवाराला एकत्र ठेवण्यासाठी लढा द्यावा लागतो. कारण त्यांना पिटर क्वील्सच्या पालकत्वाबाबत काहीतरी शंका वाटत असते. त्यातच त्यांचे जुने शत्रू पुन्हा एकत्र येत असल्याने त्यांना गार्डियन्सच्या टीमला लढा द्यावाच लागतो. दुसऱ्या भागात अधिक अॅक्शन असल्याने चित्रपटातील सर्वच पात्र मनोरंजन करणार आहेत. याचे लेखन आणि दिग्दर्शन जेम्स गन यांनी केले आहे. तर यामध्ये क्रिस प्रॅट, झो सल्डाना, डेव्ह बटिस्टा हे आहेत. विन डिजल याने बेबी ग्रूटला; ब्रेडली कूपर याने रॉकेट या पात्राला तर मायकल रूकर, करेन गिलान, पोम क्लेमेंटिफ, एलिझाबेथ डेबिचकी, क्रिस सुलिवन, सियान गन, टॉमी फ्लानागन, लॉरा हॉडोक यांच्यासह सिलवेस्टर स्टॅलोन यानेही विविध पात्रांना आवाज दिला आहे. कर्ट रसेल आणि केविन फिग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर लुईस डी एपिसोटी, व्हिक्टोरिया अलोंसो, जोनाथन श्वाटर्ज, निकोलस कोरडा आणि स्टेन ली हे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या पाच मे रोजी रिलीज होणार आहे.
विन म्हणणार ‘आय अॅम ग्रूट’
By admin | Published: April 07, 2017 2:15 AM