बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे. लवकरच ती जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमात दिसणार आहे. सुहाना खान या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आता या चित्रपटासंदर्भात आणखी एक मोठं अपडेट आलं आहे.
झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' सिनेमातून स्टारकिड्स पदार्पण करत आहेत. सुहाना खान, श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्य नंदा हे तिघेही पदार्पण करत आहेत. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात शाहरुख खानचा कॅमिओ असल्याचं म्हटलं जात आहे. पण, निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. शाहरुखची नेमकी भूमिका काय असेल यावर सध्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सस्पेन्स निर्माण केला आहे.
'द आर्चीज' चित्रपटाचा ट्रेलर ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. शाहरुखनेही हा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. गोव्याला पोर्तुगीजपासून स्वातंत्र्य मिळाले, इथपासून ट्रेलरची सुरुवात होते. ट्रेलर तुम्हाला १९६० च्या दशकात घेऊन जातो. टीएनएज रोमान्स, भांडणं असं सगळंच सिनेमात आहे. यामध्ये सुहाना जी व्हेरोनिकाच्या भूमिकेत आहे.
फुल ऑन ड्रामा असलेला हा सिनेमा ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. 'द आर्चीज' ची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी कमेंट करत स्टारकिड्सला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र नेपोटिझम नेपोटिझम म्हणत सिनेमाच्या विरोधात कमेंट केल्या आहेत. तर खुशी, सुहाना आणि अगस्त्य या स्टारकिड्समध्ये आता कोण बाजी मारतं, प्रेक्षकांना कोणाचं काम आवडतं हे तर सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.